आशिया कप स्पर्धेपूर्वी झालेल्या रंगीत तालमीत पाकिस्तानचा संघ पास झाला. काठावर पास झाला असला तरी अपेक्षा मात्र उंचावल्या आहे. सलमान आगाच्या नेतृत्वात पाकिस्तानी संघ ट्रायसिरीज खेळला. ही मालिका पाकिस्तानसाठी लिटमस टेस्ट होती. साखळी फेरीत अफगाणिस्तानने दणका दिल्यानंतर पाकिस्तान बॅकफूटवर गेला होता. मात्र अंतिम फेरीत पाकिस्तानचा पराभव करून आशिया कप स्पर्धेसाठी सज्ज असल्याचं दाखवून दिलं. तिरंगी मालिकेच्या अंतिम फेरीत पाकिस्तानने अफगाणिस्तानसमोर विजयासाठी 141 धावांचं आव्हान दिलं होतं. पण अफगाणिस्तानचा संघ 66 धावांवरच गारद झाला. पाकिस्तानने हा सामना 75 धावांनी जिंकला. या विजयानंतर पाकिस्तानचा कर्णधार सलमान आगाने आशिया कप स्पर्धेच्या तयारीबाबतच स्पष्ट काय ते सांगून टाकलं. तसेच या स्पर्धेत कोणतं नाणं खणखणीत वाजू शकते याबाबतही स्पष्ट काय ते सांगून टाकलं. एका अर्थाने पाकिस्तानने भारताविरूद्धच्या सामन्यासाठी असाच प्लान आखल्याचं दिसून येत आहे.
सलमान आघा म्हणाला की, ‘मला वाटतं की ही एक प्रकारची खेळपट्टी होती जिथे140 धावा आव्हानात्मक असणार होत्या. आम्हाला माहित होतं की त्यांच्यासाठी ते कठीण असणार आहे. नवाज पुनरागमनापासून बॅट, बॉल आणि फिल्डिंगमध्ये उत्कृष्ट कामगिरी करत आहे. जेव्हा जेव्हा आम्हाला कठीण परिस्थितीत खेळायला मिळेल तेव्हा मी त्याच्याकडे जाऊ शकतो. जेव्हा जेव्हा आम्हाला गरज असेल तेव्हा आम्ही दोन फिरकीपटू खेळवू. आम्ही परिस्थितीचे मूल्यांकन करतो आणि दोन फिरकीपटू खेळवल्याने आमच्यासाठी काम झाले.’ म्हणजेच पाकिस्तानचा कर्णधार आगाने भारताविरुद्ध नवाजचा वापर करण्याचे संकेत दिले आहेत. मोहम्मद नवाजने या सामन्यात 25 धावा केल्या. तसेच 4 षटकात एक षटक निर्धाव टाकलं आणि 19 धावांसह पाच विकेट घेतल्या.
इतकंच काय तर आशिया कप स्पर्धेच्या तयारीबाबतही सलमान आगाने आधीच सांगून टाकलं. ‘ही मालिका आशिया कपच्या तयारीबद्दल होती. मला वाटतं की आम्ही एक संघ म्हणून खरोखर चांगले करत आहोत. आम्ही बहुतेक सर्व गोष्टी चांगल्या स्थितीत आहोत आणि आशिया कपसाठी तयार आहोत.’ भारत आणि पाकिस्तान हे दोन्ही संघ 14 सप्टेंबरला आमनेसामने येणार आहे. या हायव्होल्टेज सामन्यासाठी दोन्ही संघ सज्ज आहे. पाकिस्तान या प्लेइंग 11 सह भारताविरुद्ध उतरू शकते. त्यात फार काही बदल होईल असं वाटत नाही. तर भारतीय संघ कोणत्या प्लेइंग 11 सह उतरणार याची उत्सुकता आहे.