आशिया कप 2025 स्पर्धेला 9 सप्टेंबरपासून सुरुवात होणार असून पहिला सामना अफगाणिस्तान आणि हाँगकाँग यांच्यात होणार आहे. ही स्पर्धा 28 सप्टेंबरपर्यंत चालणार असून या स्पर्धेसाठी पंच आणि सामनाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली आहे. भारत, पाकिस्तान, श्रीलंका, बांगलादेश आणि अफगाणिस्तानमधील पंचांचा समावेश करण्यात आला आहे. या स्पर्धेसाठी एकूण 10 पंच निवडले असून दोन सामनाधिकारी आहेत.वीरेंद्र शर्मा आणि रोहन पंडित (भारत), अहमद पक्तीन आणि इजतुल्लाह सफी (अफगाणिस्तान), रुचिरा पल्लियागुरुगे आणि रवींद्र विमलासिरी (श्रीलंका), आसिफ याकूब आणि फैसल आफ्रिदी (पाकिस्तान), गाजी सोहेल आणि मसुदुर रहमान (बांगलादेश) अशी पंचांची नावं आहेत. वेस्ट इंडिजचे रिची रिचर्डसन आणि झिम्बाब्वेचे अँडी पायक्रॉफ्ट यांची मॅच रेफरी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. आशियाई क्रिकेट परिषदेने या स्पर्धेसाठी सामनाधिकाऱ्यांची घोषणा केली आहे. ही नियुक्ती फक्त साखळी फेरीच्या सामन्यांसाठी आहे.
14 सप्टेंबर रोजी दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर भारत पाकिस्तान हा सामना होणार आहे. हायव्होल्टेज सामना असलेल्या भारत पाकिस्तान सामन्यासाठीही पंचांची नावे जाहीर करण्यात आली आहे. श्रीलंका, बांगलादेश आणि अफगाणिस्तानमधील तीन पंचांकडे सोपवण्यात आली आहे. एसीसीने श्रीलंकेच्या रुचिरा पल्लियागुरुगे आणि बांगलादेशच्या मसुदुर रहमान यांना मैदानी पंच म्हणून घोषित केले आहे. अफगाणिस्तानचे अहमद पक्तीन टीव्ही पंच म्हणून काम पाहतील, तर अफगाणिस्तानचे इजतुल्लाह सफी चौथे पंच असतील, ते मैदानी पंचांना मदत करतील. अँडी पायक्रॉफ्ट या सामन्यात सामनाधिकारी असतील.
खरं तर श्रीलंकेचे रुचिरा पल्लियागुरूगे हे त्यांच्या चुकीच्या निर्णयामुळे जास्त चर्चेत असतात. त्यामुळे त्यांच्या नियुक्तीने क्रीडाप्रेमींची धाकधूक वाढली आहे. वनडे वर्ल्डकप 2019 स्पर्धेत ऑस्ट्रेलिया वेस्ट इंडिज सामन्यात त्यांनी अनेक चुकीचे निर्णय दिले. त्यामुळे वेस्ट इंडिजला पराभवाचं तोंड पाहावं लागलं. गेल्या वर्षी श्रीलंका आणि भारत यांच्यातील वनडे मालिकेदरम्यानही त्यांनी चुकीचे निर्णय घेतले होते. त्यामुळे त्यांची तुलना क्रीडाप्रेमी स्टीव्ह बकनरशी करत आहेत. त्यामुळे आतापासूनच क्रीडाप्रेमींना धाकधूक लागून आहे.