Nepal Kathmandu Violence : सोशल मीडियावर बंदी घालण्यात आल्यामुळे तसेच फोफावलेल्या भ्रष्टाचारामुळे नेपाळमधील तरुण चांगलेच संतापले आहेत. नेपाळची राजधानी काठमांडूमध्ये हजारो तरुणांनी एकत्र येत सरकारविरोधात मोठे आंदोलन केले आहे. यावेळी सरकारविरोधात घोषणाबाजी करत तरुण आंदोलक संसदेवर चालून गेले आहेत. काही आंदोलकांनी तर संसदेतही प्रवेश केला. याच आंदोलनात आतापर्यंत 20 तरुणांचा मृत्यू झाला आहे. तर 250 पेक्षा जास्त आंदोलक जखमी झाले आहेत. दरम्यान, सध्याची ही परिस्थिती लक्षात घेता नेपाळ सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी सरकारने सुरक्षा यंत्रणांना दिसताक्षणी गोळी घालण्याचा आदेश दिला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार सध्या काठमांडूमध्ये आंदोलक चांगलेच संतापलेले आहेत. आतापर्यंत या आंदोलनात 20 लोकांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे परिस्थिती जास्तच चिघळण्याची शक्यता आहे. हीच बाब लक्षात घेऊन हिंसक रुप धारण केलेल्या आंदोलनावर नियंत्रण मिळवण्यासाठी सरकारने काठमांडूमध्ये कर्फ्यू लागू केला आहे. काठमांडूमधील परिस्थिती लक्षात घेऊन पंतप्रधान केपी शर्मा ओली यांनी आपत्कालीन बैठकीचे आयोजन केले होते. त्यानंतर काठमांडूमध्ये कडक कर्फ्यू लागू करण्यात आला आहे. तसेच दिसताक्षण गोळी घाला असा आदेश संरक्षण यंत्रणांना दिलेला आहे. त्यामुळे आंदोलकांनी शांतता राखावी असे आवाहन केले जात आहे.
सध्या काठमांडूमध्ये तणावाची स्थिती आहे. आंदोलक थेट संसदेवर चालून गेल्यामुळे राष्ट्रपती रामचंद्र पौडेल आणि केपी शर्मा ओली यांच्या निवासस्थानावरील सुरक्षा अधिक कडक करण्यात आली आहे. काठमांडू तसेच पोखरा या दोन शहरांत सध्या तिथे कर्फ्यू लावण्यात आला आहे. काठमांडूमध्ये लष्कराच्या दोन ते तीन तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत. त्यामुळे आता नेमके नेपाळमध्ये पुन्हा एकदा शांतता कधी स्थापित होणार? याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.
दरम्यान, काठमांडूमध्ये घडलेल्या हिंसेमुळे 9,10 आणि 11 सप्टेंबर रोजी होणाऱ्या सर्व परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. तर दुसरीकडे आंदोलनात जखमी झालेल्या 250 आंदोलकांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. यातील काही आंदोलकांची स्थिती गंभीर असून मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.