चिखली, ता. ८ : चिखलीतील साने चौक ते शिवरकर चौकापर्यंतच्या रस्त्याच्या खालून जाणारी बहुतांशी गटारे तुंबली असून संपूर्ण रस्त्यावर पाणी पसरले आहे. त्यामुळे सर्व परिसरात दुर्गंधी निर्माण झाली आहे. दररोज वाहणाऱ्या मैलामिश्रित पाण्यामुळे रोगराई पसरण्याची भीती नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे.
तळवडे आणि निगडीकडे जाण्यासाठी साने चौक ते शिवरकर चौक हा मोरे वस्ती परिसरातील मुख्य रस्ता आहे. महिन्याभरापासून या रस्त्या खालून जाणारी सांडपाणी वाहिनी आणि पावसाळी गटारे तुंबली आहेत. त्यातील सर्व सांडपाणी रस्त्यावर पसरत आहे. त्यामुळे नागरिकांना रस्त्यावरून चालणे अवघड होऊन बसले आहे. या रस्त्याच्या बाजूने असलेल्या दुकानदारांना दुर्गंधीचा त्रास होत असून दुकानांमध्ये ग्राहक येण्याचे टाळत आहेत. रस्त्याच्या बाजूने महापालिकेच्या शाळेबरोबरच खासगी शाळा देखील आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांना बस पकडण्यासाठी किंवा शाळेत जाण्यासाठी याच रस्त्याचा वापर करावा लागतो. रस्त्यावरून ये जा करणारे पादचारी महिला, ज्येष्ठ नागरिक यांना वाहनांमुळे उडणाऱ्या दुर्गंधीयुक्त पाण्याचा सामना करावा लागतो. दुर्गंधीयुक्त पाण्यामुळे माशा, डासांचेही प्रमाण वाढले आहे. याबाबत क्षेत्रीय अधिकारी ऋषिकेश कांबळे यांची संपर्क साधला असता तो होऊ शकला नाही.