Nashik News : पितृपंधरवड्यास प्रारंभ; नाशिकमध्ये 'काकस्पर्श' दुर्मिळ, स्मृतिवन उद्यानाजवळ गर्दी
esakal September 09, 2025 01:45 PM

नाशिक: लाडक्या गणरायाला शनिवारी (ता. ६) भक्तिभावात निरोप देण्यात आल्यावर सोमवार (ता. ८) पासून पितरांच्या स्मृती जागविणाऱ्या पंधरवड्यास प्रारंभ होत आहे. वृक्षवल्ली कमी झाल्याने अलीकडे शहराच्या गावठाण भागात ‘काकस्पर्श’ दुर्मिळ झाला आहे. त्यामुळे तपोवन रोडवरील स्मृतिवन उद्यानालगतच्या भिंतीवर पितरांना ‘घास’ देण्यासाठी पुढील पंधरा दिवस मोठी गर्दी उसळण्याची शक्यता आहे. दरम्यान भोजनासाठी लागणारी केळीची पाने घेऊन शेकडो आदिवासी बांधव शहरात दाखल झाले आहेत.

हिंदू धर्मियांत पितृ पक्षाला मोठे महत्त्व आहे. त्यानुसार पितर आणि पूर्वजांच्या आत्म्याच्या शांती पूजेसाठी पुढील पंधरा दिवस महत्त्वाचे मानले जातील. या काळात आपले पूर्वज पितृलोकांतून पृथ्वीवर येतात, असे धर्मशास्त्रात सांगितले आहे. या काळात श्राद्ध व पिंडदानास मोठे महत्त्व आहे. पितृ पक्षात सर्वपित्री अमावस्येला खूप महत्त्व आहे. पूर्वजांच्या मृत्यूची तिथी ठाऊक नसल्यास सर्वपित्री अमावस्येला श्राद्ध किंवा तर्पण विधी करण्याची पद्धत आहे.

यंदा पितृपक्षाच्या सुरवातीला चंद्रग्रहण तर शेवटी म्हणजे सर्वपित्रीला सूर्यग्रहण आल्यामुळे पितृ पंधरवडा खऱ्या अर्थाने वैशिष्ट्यपूर्ण असल्याची माहिती वेदशास्त्रसंपन्न स्मार्तचुडामणी शांतारामशास्त्री भानोसे यांनी दिली. या काळात पितरांच्या स्मृतीप्रित्यर्थ दान-धर्मालाही मोठे महत्त्व असल्याचे त्यांनी सांगितले. पितृपक्षात मेथी, गवार, डांगर, कारले, भेंडी, आळूची पाने आदी भाज्यांचे महत्त्व सांगण्यात आले आहे.

त्यामुळे बाजारात आजपासूनच या भाज्या मोठ्या प्रमाणावर दाखल झाल्या आहेत. साधारण एकशेवीस रुपये किलो दराने त्या बाजारात उपलब्ध आहेत. याशिवाय भोजनासाठी ताटांऐवजी केळीच्या पानांचे महत्त्व सांगण्यात आले आहे. ही पाने विकण्यासाठी आदिवासी भागातील बांधव मोठ्या संख्येने शहरात दाखल झाले आहेत.

शुभकार्य राहणार वर्ज्य

धार्मिक मान्यतेनुसार पितृपक्ष दरवर्षी भाद्रपदमधील शुक्ल पक्षाच्या पौर्णिमेपासून सुरू होतो व अश्विन महिन्यातील कृष्ण पक्षातील अमावास्येपर्यंत म्हणजे १६ दिवस चालतो. पितृपक्षाच्या काळात घरात शुभकार्य, लग्न, गृहप्रवेश, नव्या कामाला सुरुवात केली जात नाही. राज्यात काही ठिकाणी रविवार (ता. ७)पासूनच पितृपक्षाला प्रारंभ झाला असून, रविवारी (ता. २१) त्याची समाप्ती होईल.

‘एआय’च्या कलेतून गणरायाला अनोखा निरोप; सोशल मीडियावर व्हायरल होतोय उभ्या गणरायाचा व्हिडिओ

पितृपक्षाचा सोमवार (ता. ८)पासून प्रारंभ होत आहे. एखाद्या व्यक्तीचे पौर्णिमेला देहावसान झाले असल्यास त्यांचे महालय श्राद्ध पौर्णिमा किंवा सर्वपित्री अमावास्येला करावे.

- डॉ. नरेंद्र धारणे, धर्मशास्त्र अभ्यासक

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.