आशिया कप 2025 स्पर्धेला अफगाणिस्तान विरुद्ध हाँगकाँग या सामन्यापासून सुरुवात झाली आहे. आगामी वर्ल्ड कप 2026 च्या पार्श्वभूमीवर यंदा टी 20 फॉर्मेटने या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं आहे. या स्पर्धेत एकूण 8 संघात चुरस पाहायला मिळणार आहे. टीम इंडिया या स्पर्धेतील आपला पहिला सामना हा 10 सप्टेंबरला यूएई विरुद्ध खेळणार आहे. तर पाकिस्तान क्रिकेट टीमचा आशिया कप स्पर्धेतील पहिला सामना 12 सप्टेंबरला होणार आहे. पाकिस्तान आपल्या मोहिमेतील पहिल्या सामन्यात ओमान विरुद्ध भिडणार आहे. मात्र त्याआधीच पाकिस्तानला मोठा झटका लागला आहे. पाकिस्तानच्या 31 वर्षीय वेगवान गोलंदाज उस्मान शिनवारी याने तडकाफडकी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा केला आहे.
शिनवारी याने पाकिस्तानचं एकूण तिन्ही फॉर्मेटमधील 34 सामन्यांमध्ये प्रतिनिधित्व केलं. शिनवारी याने 34 सामन्यांमध्ये एकूण 48 विकेट्स घेतल्या आहेत. मात्र शिनवारी याने सर्व फॉर्मेटमध्ये निवृत्ती जाहीर केल्याने क्रिकेट चाहत्यांना झटका लागला आहे. शिनवारी याच्याआधी काही दिवसांपूर्वी पाकिस्तानचा विस्फोटक फलंदाज आसिफ अली यानेही निवृत्त होत असल्याचं जाहीर केलं होतं.
उस्मान शिनवारी याने 2013 साली आंतरराष्ट्रीय पदार्पण केलं होतं. उस्मानने श्रीलंकेविरुद्ध डेब्यू केला होता. उस्मानने पाकिस्तानचं टेस्ट, वनडे आणि टी 20i या तिन्ही फॉर्मटेमध्ये प्रतिनिधित्व केलं. मात्र उस्मानला फार संधी मिळाली नाही. उस्मानने पाकिस्तानचं 17 एकदिवसीय, 16 टी 20i आणि 1 कसोटी सामन्यात प्रतिनिधित्व केलं. उस्मानला 12 वर्षांत एकूण 34 सामन्यांमध्येच खेळण्याची संधी मिळाली.
उस्मानने 11 डिसेंबर 2019 रोजी श्रीलंकेविरुद्ध कसोटी पदार्पण केलं होतं. दुर्देवाने उस्मानचा पहिलाच सामना हा शेवटचा ठरला. उस्मानचा हा अखेरचा आंतरराष्ट्रीय सामना ठरला. त्यानंतर उस्मानला निवड समितीने संधी दिली नाही.
विरुद्ध ओमान, 12 सप्टेंबर, दुबई
विरुद्ध टीम इंडिया, 14 सप्टेंबर, दुबई
विरुद्ध यूएई, 17 सप्टेंबर, दुबई
दरम्यान पाकिस्तानचा आशिया कप स्पर्धेसाठी ए ग्रुपमध्ये समावेश करण्यात आला आहे. ए ग्रुपमध्ये पाकिस्तानसह, भारत, ओमान आणि यूएईचा समावेश आहे.