सावर्डे विद्यालयातील विद्यार्थ्यांचा
सर्वांगीण विकासाचा संकल्प
सावर्डे : गोविंदराव निकम माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात अखिल भारतीय राष्ट्रीय शैक्षणिक महासंघाच्यावतीने राबवण्यात येणारा हमारा विद्यालय-हमारा स्वाभिमान हा संस्कारक्षम व प्रेरणादायी उपक्रम उत्साहात पार पडला. या निमित्ताने श्रावणी राठोड हिने शालेय शिस्त व शाळेतील साधनसंपत्तीची काळजी घेण्याचे महत्त्व सांगितले तर दादासाहेब पांढरे यांनी राष्ट्रीयभाव व सामाजिक समरसता यावर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी राष्ट्रगीत व देशभक्तिपर गीतांचे सामूहिक गायन करून राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश दिला. सामाजिक समरसतेसाठी प्रभातफेरीचे आयोजन करण्यात आले. मुख्याध्यापक राजेंद्रकुमार वारे यांनी नागरी कर्तव्यांचे पालन या विषयावर विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले. शेवटी विद्यार्थी व शिक्षकांनी एकत्रितपणे शाळा व विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी सामूहिक संकल्प केला. या कार्यक्रमाला विद्यालयाचे उपप्राचार्य विजय चव्हाण सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
-rat९p२.jpg -
२५N९०३०२
सावर्डे : साक्षरता दिनानिमित्त विद्यार्थ्यांनी काढलेली प्रभातफेरी.
---
साक्षरता दिनानिमित्त सावर्डेत प्रभातफेरी
सावर्डे ः सह्याद्री शिक्षणसंस्था संचलित गोविंदराव निकम माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात विविध उपक्रमांच्या माध्यमातून साक्षरता दिनानिमित्त प्रभातफेरीचे आयोजन करण्यात आले. शिक्षण जीवन घडवते, आपल्या हक्क व कर्तव्यांची जाणीव करून देते आणि देशाच्या प्रगतीसाठी प्रत्येक नागरिक सुशिक्षित होणे ही काळाची गरज आहे, असे प्रतिपादन विद्यालयाचे प्राचार्य राजेंद्र वारे यांनी जागतिक साक्षरता दिनानिमित्त केले. विद्यार्थी मनोगतात ओवी पाकळे, अवनीश काकडे, वसुंधरा पाटील व आरूष जाधव यांनी साक्षरतेचे महत्त्व प्रभावीपणे मांडले. शिक्षक मंगेश दाते यांनी साक्षरतादिनाची पार्श्वभूमी व गरज स्पष्ट केली तसेच विद्यार्थ्यांना शंभर टक्के साक्षर भारत घडवण्याचे आवाहन केले. ज्येष्ठ शिक्षिका शिल्पा राजेशिर्के यांनी विद्यार्थ्यांना आपल्या परिसरातील निरक्षरांना मदत करण्याची सूचना केली. या प्रसंगी तयार केलेल्या भित्तिपत्रिकेचे उद्घाटन ज्येष्ठ शिक्षक अशोक शितोळे यांच्या हस्ते करण्यात आले. साक्षरतेबाबत जनजागृतीसाठी प्रभातफेरीचे आयोजन करण्यात आले.
-
ज्येष्ठ नागरिकांना मार्गदर्शन मिळेल ः पाटील
रत्नागिरी ः ज्येष्ठ नागरिकांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेता येत नसेल तर जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्यावतीने ज्येष्ठ नागरिकांना मार्गदर्शन दिले जाईल. आपण केव्हाही न घाबरता या प्राधिकरणाच्या कार्यालयात या, असे आवाहन जिल्हा विधी सेवा प्राधिकरण सचिव आर. आर. पाटील यांनी केले. आश्रय ज्येष्ठ नागरिक संघटनेतर्फे ज्येष्ठ नागरिकांसाठी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. या वेळी आश्रय संघटनेचे संस्थापक सुहेल मुकादम यांनी कार्यक्रमाचा हेतू सांगितला. या वेळी ॲड. वायकूळ यांनी विधी सेवा प्राधिकरणाचे विविध सेवांची माहिती दिली. या वेळी संस्थापक सुहेल मुकादम, अध्यक्ष अनिल नागवेकर, कार्याध्यक्ष सिराज खान, सरचिटणीस अहमद मालवणकर, सल्लागार शकील गवाणकर आणि शहर व परिसरातील ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. ज्येष्ठ नागरिकांनी विविध विषयांवरील अडचणी मांडल्या. याबाबत पाटील यांनी उत्तरे देऊन त्यांचे समाधान केले.