PM Modi Punjab Visit : पूरग्रस्त भागाचा आढावा घेताना मोदीही भावूक, हिमाचलनंतर या राज्यासाठी 1600 कोटींच्या पॅकेजची घोषणा
Tv9 Marathi September 10, 2025 03:45 PM

दिल्लीनंतर पंजाब, हरियाणा, हिमाचल प्रदेशात पावसाने हाहा:कार उडवला आहे. या भागात ढगफुटी झाल्याने गावागावात पूर आला आहे. हजारो लोकांचे संसार उद्ध्वस्त झाले आहेत. हिमाचल प्रदेश आणि पंजाबमधील तर परिस्थिती हाताबाहेर गेली आहे. या दोन्ही राज्यांमध्ये पावसाचा अक्षरश: कहर झाला होता. त्यामुळे या दोन्ही राज्यातील जनजीवन विस्कळीत झालं आहे. दोन्ही राज्यांना सर्वाधिक फटका बसला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज या दोन्ही राज्यांची हवाई पाहणी केली. आधी हिमाचल प्रदेशातील पूरस्थितीचा मोदींना आढावा घेतला. यावेळी त्यांनी हिमाचल प्रदेशाला 1500 कोटींचं पॅकेज जाहीर केलं. तर पंजाबसाठी 1600 कोटींचं पॅकेज जाहीर केलं आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज पंजाबच्या पूरस्थितीची हवाई पाहणी केली. त्यानंतर त्यांनी पूरग्रस्तांची भेट घेतली. यावेळी शेतकऱ्यांशीही त्यांनी संवाद साधला. तब्बल अर्धा तास त्यांनी पूरग्रस्तांशी चर्चा करून माहिती घेतली. तसेच त्यांना धीरही दिला. भाजपचे प्रदेशाध्यक्ष सुनील जाखड यांनी याबाबतची माहिती दिली आहे. अनेक शेतकऱ्यांनी त्यांची मोलमजुरी गेल्याचं पंतप्रधानांना सांगितलं. तसेच आपलं घर या महापुरात वाहून गेल्याचंही सांगितलं. अनेकांनी तर बटईने जमीन घेतली होती. पण पूरामुळे पिके नष्ट झाल्याचंही अनेक शेतकऱ्यांनी पंतप्रधांनाना सांगितलं.

अन् मोदी भावूक झाले

पंतप्रधानांनी सर्वांचं म्हणणं ऐकून घेतलं. त्यानंतर आम्ही तुमच्यासोबत आहोत. काळजी करू नका. तुम्हाला सर्वोतोपरी मदत दिली जाईल, असं आश्वासन मोदींनी दिल्याचं जाखड म्हणाले. अनेकांनी तर 2023च्या नुकसानीची भरपाईच अजूनपर्यंत मिळाली नसल्याचं पंतप्रधानांना सांगितलं. त्यावर राज्याच्या अधिकाऱ्यांशी थोड्यावेळात बैठक होणार असून त्यांना 2023ची भरपाई का दिली नाही म्हणून जाब विचारण्यात येणार असल्यचं मोदींनी सांगितलं. शेतकरी आपली व्यथा सांगत होते, तेव्हा मोदी अत्यंत भावूक झाले होते.

ਪੰਜਾਬ ਵਿੱਚ ਹੜ੍ਹਾਂ ਦਾ ਹਵਾਈ ਨਿਰੀਖਣ ਕੀਤਾ। ਅਧਿਕਾਰੀ ਪ੍ਰਭਾਵਿਤ ਲੋਕਾਂ ਦੀ ਸਹਾਇਤਾ ਲਈ ਦਿਨ-ਰਾਤ ਕੰਮ ਕਰ ਰਹੇ ਹਨ। ਇਸ ਚੁਣੌਤੀਪੂਰਨ ਸਮੇਂ ਵਿੱਚ ਸਾਡੀਆਂ ਸੰਵੇਦਨਾਵਾਂ ਲੋਕਾਂ ਨਾਲ ਹਨ। pic.twitter.com/rJP8nqEkhK

— Narendra Modi (@narendramodi)

आपचंही काहीही

पंजाब सरकारने 20 हजार कोटींच्या पॅकेजची मागणी आपने केली होती. त्यावरही जाखड यांनी प्रतिक्रिया दिली. आपचे नेते बरंच काही सांगत असतात. त्यांच्या बोलण्याकडे लक्ष देण्याची गरज नाही. त्यापेक्षा पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान हे घटनास्थळी असते तर त्यांना मोदींसमोर त्यांचं म्हणणं मांडता आलं असतं. पण ते आजारी आहेत. मुख्यमंत्री बरे व्हावेत ही आमची इच्छा आहे. पण यावेळी संपूर्ण पंजाबच आजारी पडला आहे, असंही जाखड म्हणाले.

पंतप्रधानांनी पंजाबच्या विविध भागातून आलेल्या 19 शेतकऱ्यांशी चर्चा केली. यात फाजिलिका, अजनाला, अमृतसर, डेरा बाबा नानक, श्रीहरगोविंदपूर साहिब, गुरदासपूर येथील शेतकऱ्यांचा समावेश होता. या सर्व शेतकऱ्यांनी पंतप्रधांनासमोर आपल्या व्यथा मांडल्या.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.