घोडेगाव, ता. ९ : येथील श्री संत सावतामाळी गणेशोत्सव मंडळाच्या वतीने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा या विद्यार्थ्यांसाठी व परिसरातील पंचक्रोशीतील विद्यार्थ्यांसाठी विविध गुणदर्शनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यात शाळेतील ७० तर मंडळाच्या जवळील ५० अशा १२० विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला.
घोडेगाव (ता. आंबेगाव) येथील श्री संत सावतामाळी गणेशोत्सव मंडळाचे संस्थापक अध्यक्ष माऊली घोडेकर व सर्व कार्यकारिणी यांच्या संकल्पनेतून गेली तीन वर्षे हा विविध गुणदर्शनाचा कार्यक्रम विद्यार्थ्यांसाठी आयोजित करण्यात येत आहे. कार्यक्रमाची सुरवात माऊली घोडेकर, बोरघरचे उपसरपंच राजेंद्र घोडे, शालेय व्यवस्थापन समिती संचालक मंगेश कुंभार, राजाराम काथेर, संतोष घोडेकर यांच्या उपस्थित व्यासपीठाची पूजा, श्रीफळ वाढवून करण्यात आली. तदनंतर गणेश वंदना घेऊन विविध गुणदर्शन कार्यक्रमाची सुरवात झाली. यावेळी विद्यार्थ्यांनी श्री गणेश, श्री कृष्ण, भारतीय सैनिक यावर आधारित सामुदायिक गाण्यावर नृत्य सादर केले. मंडळाच्या महिला कार्यकर्त्यांनी मंगळागौर सादर करून महाराष्ट्राची पारंपरिक संस्कृतीचे दर्शन घडवले. सर्वच कार्यक्रमांना दानशुरदात्यांनी विद्यार्थ्यांना सढळ हाताने रोख बक्षीस दिले.