-rat९p२५.jpg-
२५N९०३८९
खेड ः लोटे येथील सीईटीपी प्रकल्प.
-----
लोटे सीईटीपीचे पाणी थेट दाभोळ खाडीत
तब्बल ३० कोटींचा प्रकल्प; करंबवणे सुटणार, पण मालदोलीतील मच्छीमार चिंतेत
सकाळ वृत्तसेवा
खेड, ता. ९ : लोटे औद्योगिक वसाहतीतील सामायिक सांडपाणी प्रक्रिया केंद्रातून (सीईटीपी) सोडले जाणारे पाणी आता थेट दाभोळ खाडीपर्यंत पोहोचणार आहे. करंबवणेजवळ संपणाऱ्या पाइपलाइनचा अडीच किमी विस्तार करत ती मालदोलीच्या पुढे नेण्याचा निर्णय झाला असून, या कामासाठी एमआयडीसीकडून तब्बल ३० कोटींचा निधी मंजूर झाला आहे. मुंबईस्थित कंपनीने प्रत्यक्ष कामालाही सुरुवात केली आहे.
सध्या लोटे परशुराम औद्योगिक क्षेत्रातील प्रक्रिया केलेले सांडपाणी ६३० मिमी व्यासाच्या एचडीपीई पाइपलाइनमधून कोतवलीमार्गे करंबवणेजवळील वाशिष्ठी-जगबुडी नदी संगमात सोडले जाते. ही पाइपलाइन साडेसात किमी लांब आहे. नदीपात्राच्या अरुंद व संवेदनशील भागामुळे पाइपलाइनचा शेवट पुढे दाभोळखाडीच्या तळाशी नेण्यात येणार आहे. या भागात पाण्याची खोली व वहनक्षमता जास्त असल्याने प्रक्रिया केलेले सांडपाणी सुरक्षितपणे दूरवर सोडले जाईल. आयआयटीच्या अभ्यास अहवालानुसार, या निर्णयामुळे जलगुणवत्ता सुधारेल व प्रदूषणाचा धोका कमी होईल. औद्योगिक प्रगतीसाठी मोलाचा ठरणारा हा प्रकल्प असला तरी स्थानिक मच्छीमारांच्या शंकांना उत्तरे देणे व विश्वास मिळवणे, हा मोठा प्रश्न ठरणार आहे.
---
चौकट १
पर्यावरण, औद्योगिक विकासाचा तोल
आवश्यक एचडीपीई पाईप करंबवणे येथे साठवून ठेवले आहेत. पावसामुळे प्रत्यक्ष काम काही दिवस थांबले असले तरी उर्वरित कामे सुरू आहेत. औद्योगिक क्षेत्राच्या वाढीसोबतच पर्यावरणाचा समतोल साधण्याचा हा प्रकल्प महत्त्वाचा ठरेल, अशी अधिकाऱ्यांची अपेक्षा आहे.
------
कोट १
करंबवणे परिसरातील प्रदूषणाचा त्रास कमी होणार असला तरी पाइपलाइनचा शेवट ज्या मालदोली भागात होणार आहे तेथील मच्छीमार सध्या चिंतेत आहेत. दाभोळखाडी हा मत्स्यव्यवसायाचा मुख्य आधार असून, हजारो कुटुंबांची उपजीविका यावर अवलंबून आहे. त्यामुळे पाइपलाइनचा फटका बसू शकतो.
- सईद तांबे, मालदोली, ग्रामस्थ
--------
कोट २
लोटे उद्योग वसाहतीमधील सीईटीपीतील प्रक्रियायुक्त पाणी थेट दाभोळ खाडीत मालदोलीपर्यंत सोडण्यात येणार आहे. त्यामुळे दाभोळ खाडीतील प्रदूषण नियंत्रित करता येणार आहे तसेच खेड आणि चिपळूणच्या हद्दीत जो खाडी परिसर आहे तेथील माशांच्या प्रजातींचे संवर्धन होईल. याचा स्थानिक मच्छीमारांनाही फायदा होईल.
- सतीश पोवार, कार्यकारी अभियंता, रत्नागिरी