आशिया कप 2025 स्पर्धेची जोरदार सुरुवात झाली आहे. अफगाणिस्तानने स्पर्धेतील सलामीच्या सामन्यात हाँगकाँग विरुद्ध 94 धावांच्या फरकाने विजय मिळवला. त्यानंतर भारतीय संघाने स्पर्धेतील दुसऱ्या सामन्यात यूएईवर 9 विकेट्सने मात केली. त्यानंतर आता बांगलादेश या स्पर्धेतील आपल्या पहिल्या सामन्यासाठी सज्ज झाली आहे. बांगलादेश विरुद्ध हाँगकाँग या सामन्यात आमनेसामने असणार आहेत. हाँगकाँगचा हा या स्पर्धेतील दुसरा सामना असणार आहे. हाँगकाँगची स्पर्धेत पराभवाने सुरुवात झाली होती. त्यामुळे हाँगकाँगसाठी बांगलादेश विरुद्धचा सामना हा ‘करो या मरो’ असा असणार आहे. त्यामुळे हाँगकाँगसमोर कोणत्याही स्थितीत हा सामना जिंकण्याचं आव्हान आहे. तर बांगलादेश विजयी सुरुवात करण्याच्या तयारीने मैदानात उतरणार आहे.
बांगलादेश विरुद्ध हाँगकाँग सामना गुरुवारी 11 सप्टेंबरला होणार आहे.
बांगलादेश विरुद्ध हाँगकाँग सामना अबुधाबीतील शेख झायेद स्टेडियममध्ये आयोजित करण्यात आला आहे.
बांगलादेश विरुद्ध हाँगकाँग सामन्याला भारतीय वेळेनुसार रात्री 8 वाजता सुरुवात होईल. तर 7 वाजून 30 मिनिटांनी टॉस होईल.
बांगलादेश विरुद्ध हाँगकाँग सामना टीव्हीवर सोनी स्पोर्ट्स नेटवर्कवरील चॅनेल्सवर पाहायला मिळेल. तर सोनी लिव्ह एपवरुन मोबाईल आणि लॅपटॉपवर लाईव्ह मॅच पाहायला मिळेल.
बांगलादेश विरुद्ध हाँगकाँग यांच्यात 11 वर्षांआधी 2014 साली पहिलावहिला टी 20I सामना झाला होता. तेव्हा हाँगकाँगने बांगलादेशवर 2 विकेट्सने विजय मिळवला होता. ऑलराउंडर शाकिब अल हसन याने केलेल्या सर्वाधिक धावांच्या खेळीमुळे बांगलादेशला 100 पार मजल मारता आली होती. शाकिबने 34 धावांचं योगदान दिलं होतं. हाँगकाँगने बांगलादेशला 108 धावांवर रोखलं होतं. प्रत्युत्तरात हाँगकाँगने 8 विकेट्सच्या मोबदल्यात विजयी आव्हान पूर्ण करत बांगलादेशवर 2 विकेट्सने अविस्मरणीय असा विजय साकारला होता. त्यामुळे आता बांगलादेश या पराभवाची परतफेड करण्याच्या हिशोबाने मैदानात उतरणार आहे. त्यामुळे बांगलादेश गेल्या पराभवाचा हिशोब बरोबर करणार की हाँगकाँग सलग दुसरा विजय मिळवणार? हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.