नेपाळमध्ये सत्तेतून बेदखल झालेले माजी पंतप्रधान केपी शर्मा ओली आता भारतावर आपला संताप व्यक्त करत आहेत. ओली यांनी भारतावर शाब्दीक हल्लाबोल केला आहे. “संवेदनशील मुद्यांवर मी भारताला आव्हान देण्याची हिम्मत दाखवली. त्यामुळे मला सत्तेतून बाहेर पडावं लागलं” असा ओली यांचा दावा आहे. ओली सध्या नेपाळी सैन्याच्या शिवपुरी बॅरकमध्ये आहेत. त्यांनी आपल्या पार्टीच्या सरचिटणीसाला पाठवलेल्या एका पत्रात भारतविरोधी वक्तव्य केली आहेत. ‘जर, मी लिपुलेखबद्दल बोललो नसतो, तर आज मी त्या पदावर असतो’ असं ओली यांनी म्हटलं आहे. लिपूलेख भारताचा भाग आहे. केपी शर्मा ओली यांनी लिपूलेख नेपाळच असल्याचा दावा केला होता.
“अयोध्या आणि प्रभू रामचंद्रांबद्दलच्या भूमिकेची राजकीय किंमत चुकवावी लागली आहे. मी अयोध्येत राम जन्माला विरोध केला म्हणून मला सत्ता गमवावी लागली” असा दावा केपी शर्मा ओली यांनी केला. जुलै 2020 मध्ये नेपाळचे तत्कालीन पंतप्रधान केपी शर्मा ओली यांनी दावा केलेला की, ‘भगवान प्रभू राम भारतीय नाहीत. ते नेपाळी होते’ “नेपाळमध्ये बीरगंजच्या पश्चिमेला भगवान राम यांची अयोध्या आहे. भारताने एक वादग्रस्त अयोध्या निर्माण केलीय” अशी वक्तव्य ओली यांनी केली होती.
लिपुलेखचा वाद काय आहे?
लिपूलेख हा भारत-नेपाळमधील वादग्रस्त सीमावाद आहे. काळ्यापाण्याच्या आस-पासच हे क्षेत्र आहे. दोन्ही देश काली नदीच्या उगमावरुन असहमत आहेत. ही नदी लिपूलेखच्या उत्तर-पश्चिमेला लिंपियाधुरा येथून उगम पावते असा नेपाळचा दावा आहे. त्यामुळे काळपाणी आणि लिपूलेख या भागात येतं. भारताच म्हणणं आहे की, ही नदी काळंपाणी गावापासून सुरु होते. त्यामुळे हा उत्तराखंडचा भाग आहे.
नेपाळमध्ये सध्या राष्ट्रपती शासन
नेपाळमधल्या Gen-Z नी सोशल मीडिया बॅन आणि भ्रष्टाचाराविरोधात क्रांती करत ओली सरकारला उखडून टाकलं. ओली यांची भारताबद्दलची ही टिप्पणी पंतप्रधानपदाचा राजीनामा दिल्यानंतर आली आहे. नेपाळमध्ये सध्या राष्ट्रपती शासन आहे. अंतरिम सरकार स्थापनचे काम चालू आहे.