गोरेगाव बातम्या: मुंबई (Mumbai) शहराचा झपाट्याने होणारा विकास होताना पाहायला मिळत आहे. त्यात गोरेगाव (Goregaon) हे उपनगरदेखील मागे नाही. एकेकाळी डोंगराळ आणि वनक्षेत्र म्हणून ओळखलं जाणारं हे ठिकाण, आज मेट्रो लाईनच्या सोयी, वाढती लोकसंख्या आणि शहराचा विस्तार यामुळे गजबजलेलं आणि महागडं उपनगर बनलं आहे.
गोरेगाव पश्चिममधील मोतीलाल नगरचा पुनर्विकास आता जोरात चर्चेत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, या भागात पुनर्विकासात सामील होणाऱ्या रहिवाशांना म्हाडाकडून तब्बल 1600 चौरस फूट बिल्टअप एरिया असलेली घरं मिळणार आहेत. ही घरं बाजारात विक्रीस किंवा भाड्याने दिल्यास मालकांना भविष्यात दोन ते अडीच लाख रुपये दरमहा भाडं मिळू शकतं, अशी चर्चा रिअल इस्टेट क्षेत्रात सुरू आहे. त्यामुळे या पुनर्विकासामुळे मोतीलाल नगर ‘आधुनिक टाऊनशिप’ म्हणून उभं राहणार असून, मुंबईतील रिअल इस्टेटमधील नवा ‘हॉट स्पॉट’ ठरणार आहे.
142 एकरवरील हा बहुचर्चित प्रकल्प सुरुवातीला म्हाडा स्वतः करण्याच्या तयारीत होती. 2013 मध्ये म्हाडानं कोर्टात याबाबत हमीही दिली होती. मात्र 2018 पर्यंत प्रकल्पाचा खर्च 21 हजार कोटींपर्यंत वाढल्यामुळे, हा प्रकल्प खासगी विकासकांकडे देण्याचा निर्णय घेण्यात आला. या निर्णयाला काही रहिवाशांनी विरोध करत, हायकोर्टात हस्तक्षेप याचिका दाखल केली होती. मात्र मुंबई उच्च न्यायालयाच्या खंडपीठाने (मुख्य न्यायमूर्ती अलोक अराधे आणि न्यायमूर्ती भारती डांगरे) निकाल देत म्हाडाच्या बाजूने निर्णय दिला आणि खासगी विकासकाकडून पुनर्विकासाला मंजुरी दिली.
मोतीलाल नगरमधील चाळ क्रमांक 1, 2 आणि 3 आता खूप जुनी झाली असून, 3700 पेक्षा जास्त रहिवासी नवीन घरांच्या प्रतीक्षेत आहेत. या पुनर्विकासात रहिवाशांना इतक्या मोठ्या आकाराची घरं (1600 चौरस फूट) मिळणार आहेत, जी आतापर्यंत मुंबईतील कोणत्याही पुनर्विकासात मिळालेली नाहीत. म्हाडाच्या योजनेनुसार, हा प्रकल्प सात वर्षांत पूर्ण करण्याचा मानस असून, यासाठी तांत्रिक निविदा मागवण्यात आल्या आहेत आणि लवकरच आर्थिक निविदाही मागवण्यात येणार आहेत.
या प्रकल्पातून म्हाडाला सुमारे 33 हजार घरे मिळणार असून, ती घरं सामान्य नागरिकांसाठी विक्रीसाठी उपलब्ध करून देण्यात येतील. सध्या मुंबईत केवळ 300 ते 350 चौरस फूट बिल्टअप असलेल्या घरांसाठीही लाखो रुपये मोजावे लागतात. त्यामुळे मोतीलाल नगरमधील ही मोठी घरं स्थानिकांसाठी ‘जॅकपॉट’ आणि पुढच्या पिढ्यांसाठी सोन्यासारखी गुंतवणूक ठरणार आहेत.
गोरेगावमधील पत्राचाळ पुनर्विकास देखील आता पूर्ण झाला असून, 672 रहिवाशांना हक्काची नवीन घरं मिळणार आहेत. 2022 पासून सुरू असलेलं हे काम आता पूर्णत्वास गेले आहे.यात रहिवाशांना 2.5 BHK चे 650 चौरस फूट घर, त्यासोबत 117 चौरस फूट बाल्कनी, दोन मजली पार्किंग, गार्डन, फिटनेस आणि मेडिटेशन सेंटर, प्रत्येक विंगला दोन लिफ्ट व स्टेअरकेस आणि एक पार्किंग स्पेस अशी सुसज्ज सोय उपलब्ध करून दिली आहे. यासाठी रहिवाशांनी 15-16 वर्षांपासून संघर्ष केला होता आणि अनेक विकासकांच्या त्रासामुळे त्यांच्या अडचणीत भर पडली होती. आता त्यांचा संघर्ष संपुष्टात येत आहे.
https://www.youtube.com/watch?v=m0md6ukm0cq
आणखी वाचा
आणखी वाचा