आशिया कप स्पर्धेच्या पहिल्याच सामन्यात पाकिस्तानचा कर्णधार बदलण्याची वेळ! झालं असं की…
GH News September 11, 2025 08:53 PM

आशिया कप 2025 स्पर्धेत भारताच्या चमकदार कामगिरीनंतर पाकिस्तानकडे लक्ष लागून आहे. पाकिस्तानने नुकतंच ट्राय सीरिजमध्ये कर्णधार सलमान आघाच्या नेतृत्वात अफगाणिस्तानला पराभूत केलं आणि जेतेपद मिळवलं होतं. आता त्याच्याच नेतृत्वात आशिया कप स्पर्धेत पाकिस्तानी संघ उतरला आहे. पाकिस्तानचा आशिया कप स्पर्धेतील पहिला सामना ओमान विरुद्ध 12 सप्टेंबरला होणार आहे. पाकिस्तानचा संघ या सामन्यासाठी जय्यत तयारी करत आहे. पण पहिल्या सामन्यापूर्वीच पाकिस्तानी संघात खळबळ उडाली आहे. कारण पहिल्याच सामन्यात कर्णधार सलमान खेळेल की नाही याबाबत शंका आहे. कारण पाकिस्तानचा कर्णधार सलमान अली आघा मानेला दुखापत झाली आहे. मानेच्या दुखण्याने त्रस्त असलेला सलमान आघा संघाच्या सरावापासून दूर राहिला आहे.जिओ न्यूजच्या वृत्तानुसार, सलमान अली आघा याला मानदुखीचा त्रास होत आहे. त्यामुळेच 10 सप्टेंबर रोजी झालेल्या सराव सत्रात भाग घेतला नव्हता. सलमान संघासोबत सरावासाठी मैदानावर आला होता पण सरावापासून दूर राहिला. यावेळी त्यांच्या मानेवर पट्टी लावण्यात आल्याचे वृत्त आहे.

ओमानविरुद्धचा सामना पाकिस्तानसाठी आशिया कप स्पर्धेतील रंगीत तालीम आहे. संघाचा कर्णधार सलमानच्या तंदुरुस्तीच्या समस्येमुळे संघ अडचणीत आला आहे. जर सलमान आघा पहिल्या सामन्यात खेळला नाही तर कर्णधारपदाची धुरा कोणाच्या खांद्यावर असेल याची उत्सुकता आहे. कारण पाकिस्तान संघाने उपकर्णधाराच्या नावाची घोषणा केलेली नाही. दुसरीकडे, 14 सप्टेंबरला भारत पाकिस्तान सामना होणार आहे. या सामन्याकडे क्रीडाविश्वाचं लक्ष लागून आहे. जर कर्णधार पहिल्याच सामन्याला मुकला तर भारताविरुद्ध खेळेल की नाही याबाबत शंका आहे. त्यामुळे पाकिस्तान संघाला निश्चितच मोठा धक्का असेल. दोन्ही देशांसाठी हा सामना प्रतिष्ठेचा आहे.

दुसरीकडे, पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने स्पष्ट केलं की, सलमानच्या दुखापतीच्या समस्येकडे गांभीर्याने पाहण्याची आवश्यकता नाही. हा फक्त एक खबरदारीचा उपाय आहे. तो लवकरच पूर्ण प्रशिक्षणात परतेल. आशिया कपच्या महत्त्वाच्या सामन्यांसाठी कर्णधार तंदुरुस्त असेल असा दावा पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने केला आहे. त्यामुळे नेमकं काय ते ओमानविरुद्धच्या नाणेफेकीवेळी स्पष्ट होईल. नाणेफेकीसाठी सलमान आघा येणार की नाही? याकडे क्रीडाप्रेमींचं लक्ष असेल.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.