कोळंब येथे आज
प्रशिक्षण कार्यशाळा
मालवण: मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानांतर्गत तालुकास्तरीय प्रशिक्षण कार्यशाळा उद्या (ता. १२) सकाळी १०.३० वाजता कोळंब येथील श्री समर्थ मंगल कार्यालय सभागृहात आयोजित करण्यात आली आहे. या कार्यशाळेत आमदार नीलेश राणे उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत, अशी माहिती गटविकास अधिकारी श्याम चव्हाण यांनी दिली. या कार्यशाळेस विविध विभागांचे अधिकारी, तसेच तालुक्यातील सर्व सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, ग्रामपंचायत कर्मचारी, ग्रामरोजगार सहायक, संगणक परिचालक आणि मुख्य सेविकांना आमंत्रित करण्यात आले आहे. यामध्ये गट शिक्षणाधिकारी, विविध उपविभागांचे उपअभियंता, बाल विकास प्रकल्प अधिकारी आणि तालुका आरोग्य अधिकारी यांचा समावेश आहे. या अभिनयात मूल्यमापन कालावधी तालुकास्तरीय ११ ते २६ जानेवारी, जिल्हास्तरीय २८ जानेवारी ते १५ फेब्रुवारी, विभागस्तरीय १७ ते २७ फेब्रुवारी, राज्यस्तरीय संपूर्ण मार्च महिना असे असणार आहे.
......................
मुंबईत मंगळवारी
रोजगार मेळावा
सावंतवाडीः महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या रोजगार विभागाने सिंधुदुर्गातील युवक-युवतींसाठी रोजगार मेळाव्याचे आयोजन केले आहे. हा मेळावा मंगळवारी (ता. १६) सकाळी १० ते सायंकाळी ५ या वेळेत टिळक भवन, दादर, मुंबई येथे होणार आहे. या मेळाव्यात ८० हून अधिक नामांकित कंपन्या सहभागी होणार असून, तरुणांना विविध क्षेत्रांतील नोकरीच्या संधी उपलब्ध होतील. नोकरीच्या संधींबरोबरच करिअर मार्गदर्शन आणि कौशल्य-विकास कार्यशाळांचे आयोजनही केले आहे, जेणेकरून तरुणांना त्यांच्या करिअरसाठी योग्य दिशा मिळेल. उच्च शिक्षित गरीब आणि मध्यमवर्गीय तरुणांसाठी हा मेळावा एक विशेष संधी आहे. सिंधुदुर्गातील युवक-युवतींनी या सुवर्णसंधीचा लाभ घेऊन आपल्या करिअरला नवी दिशा द्यावी, असे आवाहन बाबू गवस यांनी केले आहे.
......................
सावंतवाडीत ‘स्नेह’तर्फे
रविवारी चित्रकला स्पर्धा
सावंतवाडीः स्नेह नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित, सावंतवाडी आणि रोटरी क्लब सावंतवाडी यांच्यावतीने रविवारी (ता. १४) सकाळी ११ वाजता येथील कळसुलकर हायस्कूल येथे चित्रकला स्पर्धेचे आयोजन केले आहे. जास्तीत जास्त स्पर्धकांनी या स्पर्धेत सहभागी व्हावे, असे आवाहन स्नेह नागरी सहकारी पतसंस्थेतर्फे करण्यात आले आहे. स्पर्धेचे स्वरुप असेः ज्युनिअर केजी/शिशू वर्ग १-चित्रात रंग भरणे, सीनिअर केजी/बालवाडी-रंग भरणे, पहिली ते दुसरी- आवडता प्राणी किंवा पक्षी/पावसाळा, तिसरी ते चौथी-निसर्ग-स्वच्छता. स्पर्धकांना कागद आयोजकांकडून पुरविण्यात येईल. इतर साहित्य स्पर्धकांनी स्वतः आणायचे आहे. इच्छुक स्पर्धकांची नावे स्नेह नागरी सहकारी पतसंस्था सावंतवाडी येथे कळविण्यात यावीत. स्पर्धेच्या ठिकाणी नावनोंदणी करून घेण्यात येईल, अशी माहिती देण्यात आली.