Satej Patil vs Shoumika Mahadik : ‘शौमिका महाडिक या गोकुळ अध्यक्ष नविद मुश्रीफ यांना भेटल्या. त्यांनी महाडिक यांच्या सर्व प्रश्नांची उत्तरे दिली. सर्वसाधारण सभेतही ५५ मिनिटे उत्तरे देण्यात आली. महाडिकांच्या लेखी प्रश्नांनाही लेखी उत्तरे दिली गेली, मात्र राजकारणाच्या उद्देशाने नविद मुश्रीफ यांच्यावर टीका केली जात आहे. उत्तरे समजण्यासाठीही परिपक्वता लागते,’ असा आरोप विधान परिषदेचे गट नेते सतेज पाटील यांनी केला. जनसुरक्षा कायद्याच्या विरोधातील निदर्शनानंतर त्यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते बोलत होते.
गोकुळ सभेनंतर संचालिका शौमिका महाडिक यांनी केलेल्या टीकेबद्दल विचारले असता सतेज पाटील म्हणाले, ‘सभासदांच्या सर्व प्रश्नांची उत्तरे सविस्तरपणे दिली गेली आहेत. लेखी उत्तरेही दिली, मात्र उत्तरे समजून घेण्यासाठीही परिपक्वता लागते. महाडिकांना जिल्ह्याच्या राजकारणातून बाजूला काढण्याचा कौल जनतेने दिला होता. दोन लाख ७० हजार मतांनी त्यांच्या पराभवापासून सुरू झालेला त्यांचा प्रवास गोकुळच्या पराभवापर्यंत आला. जनतेलाच ते जिल्ह्याच्या राजकारणात नको आहेत.’
ते पुढे म्हणाले, ‘विधानसभा आणि लोकसभेला शेवटपर्यंत मतदान नोंदणी सुरू होती. शेवटच्या टप्प्यात काही बनावट नावे आली का? असा संशय लोकांना आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत तरी असे होऊ नये. ३१ जुलै ही तारीख आम्हाला सांगण्यात आली आहे, मात्र नंतर याद्यांमध्ये नावे वाढवू नयेत, अशी अपेक्षा आहे.’
अजित पवारांची चौकशी करावी
‘कायद्याने काम करणाऱ्या अधिकाऱ्यांची अडवणूक उपमुख्यमंत्री अजित पवार करतात. त्यांची चौकशी मुख्यमंत्र्यांनी केली पाहिजे. महायुतीचे मंत्री अधिकाऱ्यांचा अपमान करतात. त्यामुळे अधिकाऱ्यांच्यात नाराजी आहे. भारतीय जनता पक्षाला घटक पक्षांची अडचण होत आहे. मात्र, सत्तेसाठी ते तडजोड करत आहेत, असेही आमदार पाटील म्हणाले.