ई-शिवाई बस अडकली खड्ड्यात
धरमतरजवळील घटना, प्रवाशांची सुखरूप सुटका
पोयनाड, ता. १० (बातमीदार) : वडखळ-अलिबाग राज्यमार्गावरील खड्ड्यांचा सर्वसामान्यांबरोबर एसटीला फटका बसला आहे. मंगळवारी (ता. ९) ठाण्याहून अलिबागला जाणारी ई-शिवाई बस खड्ड्यात अडकल्याने आपत्कालीन दरवाजातून प्रवाशांना बाहेर काढण्याची वेळ आली.
धरमतर पुलाच्या पुढे रस्त्यावरील खड्ड्यांच्या चिखलात डाव्या बाजूचे चाक अडकल्याने प्रवाशांचा खोळंबा झाला. बस पूर्ण वातानुकूलित असल्याने एका बाजूला खड्ड्यात चाक अडकल्याने स्वयंचलित दरवाजा उघडता येत नव्हता. या घटनेत कोणतीही जीवीतहानी झाली नाही; पण आपत्कालीन दरवाजातून प्रवाशांना बाहेर काढण्याची वेळ आली. स्थानिक नागरिकांच्या मदतीने सुखरूप बाहेर काढण्यात आल्यानंतर पुढील एसटीने प्रवासी अलिबागकडे रवाना झाले; पण या प्रकारामुळे काहीकाळासाठी वाहतूक कोंडी झाली होती. दरम्यान, वडखळ-अलिबाग राज्यमार्गावरील खड्ड्यांचा वाहतुकीला फटका बसत असल्याने प्रशासनाने तातडीने लक्ष घालून राज्यमार्ग सुरळीत करावा, अशी मागणी स्थानिकांकडून होत आहे.