हाच बंगला पाहिजे! कलाकेंद्रातल्या नर्तकीवर लाखोंची दौलत उधळली तरी हट्ट संपेनात; गोविंद बर्गेंच्या मृत्यू प्रकरणी धक्कादायक खुलासे
esakal September 11, 2025 10:45 PM

Govind Barge: बीडच्या गेवराई तालुक्यातील लुखमसला गावचे माजी उपसरपंच गोविंद बर्गे यांनी मंगळवारी स्वत:च्या गाडीत गोळी झाडून घेत आत्महत्या केलीय. या प्रकरणी २१ वर्षीय तरुणीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. गोविंद बर्गे मंगळवारी सासुरे गावात गेले होते. तरुणीच्या घरासमोरच गाडीत त्यांनी गोळी झाडून घेतली. या घटनेनंतर पोलीस पिस्तुलाची चौकशी करत आहेत. आतापर्यंत या प्रकरणी अनेक धक्कादायक खुलासे झाले आहेत. २१ वर्षीय आरोपी तरुणीने गोविंद बर्गे याच्याकडून लाखो रुपये, जमीन, फ्लॅट, सोने आणि फोन घेतल्याची माहिती समोर आलीय. तसंच गोविंद बर्गे याच्या मित्रांनीही धक्कादायक खुलासे केले आहेत.

गेवराईत गोविंद बर्गे यांनी आलिशान बंगला बांधला होता. या बंगल्यात २ दिवस ती तरुणी राहिली होती. तिला बंगला आवडताच तो नावावर करण्याचा हट्ट तिने धरला. दुसरा बंगला बांधून देतो, हा बंगला तुला दिला तर माझी बदनामी होईल असं गोविंद बर्गे तिला सांगत होते. तरीही तरुणीने वाढदिवसाआधी बंगला नावावर करण्याचा हट्ट धरला.

'गेवराई तालुक्यातील माजी उपसरपंचाने प्रेम संबंधातून जीवन संपवले'; नर्तकी कोठडीत, घातपात असल्याचा नातेवाइकांचा आरोप..

बंगला नावावर करा, भावाला ५ एकर जमीन द्या अशी मागणी तरुणीकडून सातत्यानं केली जात होती. बंगला नावावर केला नाही तर बलात्काराची तक्रार देईन अशी धमकी तरुणीने दिली होती असा आरोप गोविंद यांच्या नातेवाईकांनी केला आहे. गोविंद यांना आत्महत्येला प्रवृत्त केल्या प्रकरणी २१ वर्षीय तरुणीला पोलिसांनी अटक केलीय. तिला तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

गोविंद बर्गे यांना कलाकेंद्रात जायचा नाद होता. वर्षभरापूर्वीच तरुणीसोबत त्यांची ओळख झाली होती. यानंतर त्यांच्यात प्रेमसंबंध निर्माण झाले. दरम्यान, तरुणीने गोविंद यांच्याकडून लाखो रुपये उकळले होते. कलाकेंद्रासाठी ८ लाख रुपये दिल्याचा दावाही करण्यात येत आहे. दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून तरुणीकडून बंगला, जमीन यांची मागणी केली जात असल्यानं गोविंद हे तणावात होते. तरुणीनेही हट्ट धरत त्यांच्याशी बोलणं बंद केलं होतं.

तरुणी बोलायची बंद झाल्यानं गोविंद अस्वस्थ झाले होते. शेवटी गोविंद यांनी तरुणीच्या मैत्रिणीला बोलावून बोलण्याचाही प्रयत्न केला. पण तरीही नकार दिल्यानं शेवटी तरुणीच्या आईच्या घरासमोर जात त्यांनी गाडीचे दरवाजे लॉक करून डोक्यात गोळी झाडून घेतली.

गोविंद यांनी तरुणीला अनेकदा फोन पेवर पैसे पाठवले होते. तिला आणि तिच्या भावाला महागडा मोबाईल, बुलेट दिली होती याशिवाय तरुणीची आई जिथे राहत होती तिथं घराचं बांधकामही केलं होतं. तुळजाभवानी कलाकेंद्रातील तरुणीच्या मावशीच्या नावावर वैराग इथं फ्लॅट, नातेवाईकांच्या नावे ३ एकर शेतीही घेऊन दिली होती. गोविंद बर्गे हे कंत्राटदार होते. त्यांनी तरुणीला सोन्याचे दागिणेही दिले होते.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.