रेती-खडीमुळे सावरोली-खारपाडा राज्यमार्ग धोकादायक
esakal September 11, 2025 10:45 PM

रेती-खडीमुळे सावरोली-खारपाडा राज्य मार्ग धोकादायक
इसांबे गाव हद्दीत रेती पडल्याने अपघाताची भीती
खालापूर, ता. ११ (बातमीदार) : सावरोली–खारपाडा राज्य मार्ग हा परिसरातील महत्त्वाचा रस्ता मानला जातो. या मार्गावरून दररोज मोठ्या प्रमाणात अवजड वाहने, कारखान्यांची वाहतूक तसेच १२ गावांचा दैनंदिन प्रवास सुरू असतो. मात्र गेल्या आठ दिवसांपासून इसांबे गाव हद्दीतील या रस्त्यावर पडलेल्या रेतीमुळे मार्ग अपघातप्रवण झाला आहे. दुचाकीस्वारांसाठी तर हा प्रवास धोकादायक ठरत असून, लहान-मोठ्या अपघातांच्या घटना घडत आहेत.
गौण खनिज वाहतुकीतून होणाऱ्या रेती–खडीच्या वहनावेळी प्रमाणापेक्षा जास्त माल भरला जातो. त्यामुळे मोठ्या प्रमाणात रेती व खडी रस्त्यावर सांडते. यामुळे रस्ता नेहमीच निसरडा होतो. काही दुचाकीस्वार रेतीवरून घसरून जखमी झाल्याच्या घटना घडल्या आहेत. सुदैवाने आतापर्यंत मोठा अपघात टळला असला तरी भविष्यात शक्यता नाकारता येत नाही. या गंभीर प्रकाराबाबत दिलासा फाउंडेशन रस्ता सुरक्षा अभियानातर्फे खालापूर पोलिस ठाण्यात लेखी निवेदन देऊन कारवाईची मागणी करण्यात आली आहे. रेती वाहतूक करणाऱ्या वाहनांवर नियमभंगाबाबत दंडात्मक कारवाई करावी, अशी मागणी संस्थेने केली आहे. तसेच सार्वजनिक बांधकाम विभाग (उरण विभाग) तातडीने रस्त्यावरील रेती–खडी साफ करून नागरिकांना दिलासा द्यावा, अशीही अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली आहे. प्रशासन अपघात झाल्यावरच जागे होते. रस्त्यावरून रेती–खडी काढून टाकणे ही तातडीची गरज असल्याचे वाहनचालकांकडून सांगण्यात आले अन्यथा कोणत्याही क्षणी मोठी दुर्घटना घडू शकते. सावरोली–खारपाडा मार्गावर वाढती औद्योगिक वाहतूक लक्षात घेता रस्ता सुरक्षित ठेवण्यासाठी नियमित सफाई, वाहनांवर काटेकोर निर्बंध आणि पोलिसांची कडक नजर ही काळाची गरज असल्याचे सांगण्यात येत आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.