Nepal Protests : हिंसक आंदोलनानंतर नेपाळमध्ये तणाव; देशभर संचारबंदी
esakal September 12, 2025 12:45 AM

काठमांडू : नेपाळमध्ये दोन दिवसांच्या हिंसक आंदोलनानंतर आज तणावपूर्ण वातावरण होते. देशाचे पंतप्रधान आणि अध्यक्षांनी राजीनामा दिल्यानंतर मंगळवारी (ता. ९) रात्रीपासूनच सैन्यदलाने अंतर्गत सुरक्षा आपल्या हाती घेत देशभर निर्बंध लागू केल्यामुळे आज कोठेही निदर्शने झाली नाहीत. सैन्याने आज संध्याकाळनंतर देशभर संचारबंदी लागू करत आंदोलन पुन्हा न भडकण्याची खबरदारी घेतली.

समाज माध्यमांवरील बंदीच्या निषेधार्थ निदर्शने करत नेपाळमधील युवकांनी सरकार भ्रष्ट असल्याचा आरोप करत पंतप्रधानांच्या राजीनाम्याची मागणी केली होती. त्यांनी सोमवारी आणि मंगळवार असे दोन दिवस सरकारविरोधात प्रचंड मोठे आंदोलन करत सरकारी इमारतींवर हल्ले केले होते. संसदेसह मंत्र्यांची व नेत्यांची घरेही त्यांनी जाळली. अराजकतेची ही स्थिती हाताबाहेर गेल्याने देशाचे पंतप्रधान के. पी. शर्मा ओली आणि अध्यक्ष रामचंद्र पौडेल यांनी राजीनामा दिल्याने सरकार कोसळले आहे.

या परिस्थितीत मंगळवारी रात्रीपासूनच सैन्यदलाने अंतर्गत सुरक्षा आपल्या हाती घेतली असून राजधानी काठमांडूमध्ये ठिकठिकाणी सैनिक तैनात करण्यात आले आहेत. नागरिकांना घरातून बाहेर न पडण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. आंदोलनाच्या नावाखाली लुटालूट आणि दंगल होऊ नये, यासाठी ही संचारबंदी लागू केली केल्याचेही सैन्यदलातर्फे सांगण्यात आले. संचारबंदीचा भंग केल्यास कठोर शिक्षा करण्याचा इशाराही सैन्यदलाने एका निवेदनाद्वारे दिला आहे.

पर्यटकांना मदतीसाठी सूचना

संचारबंदीदरम्यान रुग्णवाहिका, अग्निशमन दले, आरोग्य कर्मचारी आणि सुरक्षा दलांसारख्या अत्यावश्यक सेवांमधील कर्मचाऱ्यांनाच घराबाहेर पडण्याची परवानगी देण्यात आली आहे. विदेशी पर्यटकांनी नजीकच्या पोलिस ठाण्याशी अथवा सैनिकांशी संपर्क साधावा, असेही आवाहन करण्यात आले आहे. पर्यटकांना आवश्यक ती मदत करण्याच्या सूचना हॉटेल व्यावसायिक आणि पर्यटन कंपन्यांना देण्यात आल्या आहेत.

विमानतळ खुले

आंदोलनानंतर येथील त्रिभुवन आंतरराष्ट्रीय विमानतळ आज संध्याकाळपासून पुन्हा सुरू करण्यात आले. हे विमानतळ जवळपास २४ तास बंद होते. देशातील परिस्थितीमुळे हे विमानतळ अनिश्चित काळासाठी बंद करण्याची घोषणा कालच (ता. ९) झाली होती. मात्र, विमानतळ अधिकाऱ्यांनी सुरक्षा दलांबरोबर चर्चा केल्यानंतर हा निर्णय घेतला. या निर्णयामुळे नेपाळमध्ये अडकून पडलेल्या शेकडो विदेशी पर्यटकांना दिलासा मिळाला आहे.

  • प्रमुख शहरांमध्ये सैनिक तैनात काठमांडूसह प्रमुख शहरांत शुकशुकाट

  • दिल्लीत नेपाळ दूतावासाबाहेरील सुरक्षा वाढविली

  • संघर्षातील मृतांची संख्या २५ वर

  • जाळपोळ करणाऱ्या २७ जणांना अटक, शस्त्रे जप्त

  • नेपाळमधील स्थितीबाबत संयुक्त राष्ट्रांकडून चिंता

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.