भारतात कोणत्याही सणा-समारंभामध्ये महिला गजरा घालताना दिसतात. पण या गजऱ्यामुळे जर एखादा लाखाचा दंड बसला तर?
केरळमधील अभिनेत्री नव्या नायरला ऑस्ट्रेलियातील विमानतळ अधिकाऱ्यांनी 1.14 लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे. मोगऱ्याच्या फुलांचा गजरा सोबत नेल्याबद्दल नव्या नायरला हा दंड झाला आहे.
अभिनेत्री नव्या नायरनं असंही म्हटलं आहे की हा दंड भरण्यासाठी तिला 28 दिवसांची मुदत देण्यात आली आहे.
अभिनेत्रीला दंड बसल्यानंतर सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात चर्चा सुरू झाली असून बाहेर देशात जाताना काय काळजी घ्यावी अशी देखील विचारणा होत आहे.
विमानात मोगऱ्याची फुलं घालण्यात काय अडचण आहे? ऑस्ट्रेलियातील कायद्यात काय म्हटलं आहे?
ऑस्ट्रेलियातील मल्याळी फेडरेशन ऑफ व्हिक्टोरियानं 6 सप्टेंबरला ओणमचा सण साजरा करण्याचं ठरवलं होतं.
या कार्यक्रमासाठी केरळमधील अभिनेत्री नव्या नायर यांना विशेष पाहुण्या म्हणून निमंत्रित करण्यात आलं होतं.
आधी कोची विमानतळाहून सिंगापूरला गेल्याचं आणि तिथून पुढे मेलबर्नला गेल्याचं नव्या नायर यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम पेजवर म्हटलं आहे.
त्यात पुढे त्या म्हणाल्या आहेत, "मी मेलबर्नला पोहोचण्यापूर्वी, माझ्या वडिलांनी माझ्यासाठी मोगऱ्याची फुलं आणली होती. त्यांनी त्याचे दोन भाग केले होते."
"15 सेमी लांबीची मोगऱ्याची फुलं, 1.14 लाख रुपयांची"नव्या नायर यांनी म्हटलं आहे की, तिच्या वडिलांनी तिला कोचीहून सिंगापूरला जाताना मोगऱ्याचा एक गजरा त्यांना डोक्याला लावण्यासाठी दिला आणि दुसरा गजरा त्यांच्या हँडबॅगेत ठेवण्यास सांगितला होता. कारण ती फुलं कोमेजली असती.
नव्या नायर म्हणाल्या, हँडबॅगेत 15 सेमी लांबीचा मोगऱ्याचा गजरा बाळगल्याबद्दल ऑस्ट्रेलियातील विमानतळ अधिकाऱ्यांनी त्यांना 1,980 ऑस्ट्रेलियन डॉलर्सचा (1.14 लाख रुपये) दंड भरण्यास सांगितलं.
"माझ्या हातून ते अज्ञानानं झालं असलं, तरी मी त्यासाठी सबब देऊ शकत नाही. फुलं आणण्यास कायद्यानं बंदी आहे. मी हे मुद्दाम केलेलं नाही. विमानतळ अधिकाऱ्यांनी मला हा दंड 28 दिवसांच्या आत भरण्यास सांगितलं," असं नव्या नायर म्हणाल्या.
नव्या नायर यांनी या गोष्टीची माहिती व्हिक्टोरियात ओणमसाठीच्या कार्यक्रमात बोलताना दिली. त्या विनोदानं म्हणाल्या, "मी माझ्या डोक्यावर तब्बल एक लाख रुपये किमतीची मोगऱ्याची फुलं घातली आहेत."
फुलं आणि फळांवर बंदी का आहे?"ऑस्ट्रेलियाची जैवसृष्टी खास, वेगळी आहे. तिथे जर परदेशातून फुलं, फळं आणि बिया आल्या तर त्यामुळे तिथल्या पर्यावरणात बदल होतील असं त्यांना वाटतं," असं जयचंद्रन थांगावेलू म्हणाले.
ते भारतीय वंशाचे ऑस्ट्रेलियातील नागरिक असून गेल्या 22 वर्षांपासून ऑस्ट्रेलियात व्यवसाय करत आहेत.
जयचंद्रन यांनी बीबीसीला सांगितलं, "ऑस्ट्रेलियात विमानानं ताजी फळं आणि भाजीपाला आणण्यास मनाई आहे. फुलं आणण्यास मनाई आहे. तसंच तुपापासून बनवलेला कोणताही पदार्थ आणू नये असाही नियम आहे."
"जर तुम्ही ऑस्ट्रेलियात पोहोचण्यापूर्वी सिंगापूर विमानतळावर अन्न विकत घेतलं आणि खाल्लं, तर त्यातील उरलेलं अन्नं तुम्ही विमानातून आणू शकता. मात्र इमिग्रेशन अधिकाऱ्यांनी तपासणी करण्यापूर्वी तुम्हाला ते कचराकुंडीत फेकावं लागतं," असं जयचंद्रन म्हणाले.
ऑस्ट्रेलियाच्या सीमाशुल्क अधिकाऱ्यांना ऑस्ट्रेलियन बॉर्डर फोर्स म्हणतात. ते ऑस्ट्रेलियात प्रवेश करणाऱ्या प्रवाशांचं सामान तपासतात.
ऑस्ट्रेलियात काय कायदा आहे?परदेशी प्रवाशांनी ऑस्ट्रेलियात प्रवेश करताना कोणत्या गोष्टी आणाव्यात आणि कोणत्या गोष्टी आणू नयेत याची यादी ऑस्ट्रेलियातील सरकारनं दिलेली आहे.
त्यानुसार, ऑस्ट्रेलियाच्या सरकारी वेबसाईटनुसार प्रवाशांच्या अराईव्हल कार्डवर याची नोंद असली पाहिजे.
जैवसुरक्षेच्या अंतर्गत ऑस्ट्रेलियात कोणत्या गोष्टी आणता येणार नाहीत, याचीही यादी ऑस्ट्रेलियाच्या सरकारनं दिली आहे. त्यानुसार,
ऑस्ट्रेलियाच्या सरकारनं म्हटलं आहे की या गोष्टींमुळे ऑस्ट्रेलियात कीटक येऊ शकतात, तसंच रोग येऊ शकतात. यामुळे ऑस्ट्रेलियाती वातावरणाला हानी पोहोचू शकते.
ऑस्ट्रेलियात येणाऱ्या प्रवाशांकडे जर यातील कोणतीही वस्तू असेल तर त्याची त्यांनी माहिती दिली पाहिजे.
याची माहिती न दिल्यास '5,500 ऑस्ट्रेलियन डॉलर्सइतका दंड होऊ शकतो' तसंच त्या 'प्रवाशाचा व्हिसा रद्द होऊ शकतो' आणि त्या व्यक्तीला 'ऑस्ट्रेलिया सोडेपर्यंत ताब्यात ठेवलं जाऊ शकतं'.
या गोष्टी टाळण्यासाठी प्रवासी त्यांच्या सामानासंदर्भात सीमा शुल्क अधिकाऱ्यांचा सल्ला मागू शकतात, असं ऑस्ट्रेलियाच्या सरकारनं म्हटलं आहे.
क्रिकेट बॅटवर धूळ असली तरी दंडत्रिचीचे अशोक राजा माजी वैमानिक आहेत. ते म्हणाले ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडमधील नियम सारखेच आहेत.
ते म्हणाले, "ऑस्ट्रेलियातील जैवसुरक्षेची काळजी घेण्यासाठी तिथले लोक कटिबद्ध आहेत. त्यांच्या देशात बाहेरून कोणतीही प्रजाती किंवा वस्तू येऊ नये याची ते काळजी घेतात."
अशोक राजा पुढे म्हणाले की त्यांच्या एका नातेवाईकाला ऑस्ट्रेलियात क्रिकेटची बॅट नेण्यास मनाई करण्यात आली होती.
"त्या क्रिकेट बॅटवर धूळ होती. इतर देशांमधील धूळदेखील ऑस्ट्रेलियात येऊ नये याची ते काळजी घेतात. यासाठीचे नियम कडक आहेत. त्यामुळे ती बॅट नेण्यास त्यांनी मनाई केली," असं ते म्हणाले.
प्रवाशांनी काय काळजी घ्यावी?माजी वैमानिक अशोक राजा म्हणाले, "एखाद्या देशात काय नियम असतात याची माहिती विमानसेवा कंपन्या तुम्हाला देत नाहीत. त्या देशाच्या विमानतळावर तुम्ही उतरलात की तुम्हाला देण्यात आलेल्या डिस्क्लेरेशन फॉर्ममध्ये सर्व माहिती देण्यात आलेली असते. जर तुम्ही त्यात सर्व माहिती दिली, तर तुम्हाला दंड किंवा शिक्षा होण्याची शक्यता नसते."
जयचंद्रन म्हणाले, "जर तुम्ही एखाद्या वस्तूची माहिती न देता ती आणली आणि तो तुमचा पहिलाच गुन्हा असेल तर तुम्हाला माफ करण्यात येईल किंवा दंड आकारला जाईल."
"ही गोष्ट त्या अधिकाऱ्यांवर अवलंबून असते. काहीजण तुम्हाला माफ करतील. मात्र जर तुम्ही वारंवार तशी चूक करत राहिलात तर तुम्हाला तुरुंगवासदेखील होऊ शकतो."
ते म्हणतात, "तुम्ही सोबत नेत असलेल्या सामानाबद्दल दक्ष असलं पाहिजे. तुम्ही जे काही सोबत नेलं असेल त्याची 100 टक्के माहिती दिली पाहिजे. जर तुम्हाला त्यात काही शंका असेल, तर बॉर्डर पोलीस अधिकारी तुम्हाला मदत करतील."
बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.