इस्लामाबाद: इस्राईल या ताकदवान ज्यूंच्या राष्ट्राशी पंगा घेणारे पॅलेस्टाईन ( हमास अतिरेकी ), लेबनान ( हेजबोल्लाह अतिरेकी संघटना ), सिरीया ( आयएसआएस अतिरेकी ) येमेन ( हुती अतिरेकी गट ) नष्ट झाले आहेत. यांचे समर्थन करण्यासाठी इराणने जेव्हा इस्राईलशी दोन हात केले तेव्हा इस्राईली सैन्याने तेहराणमध्ये मोठा विध्वंस केला. अर्थात या दोन्ही देशांदरम्यान झालेल्या युद्धात इस्राईलचे देखील नुकसान झाले. या हल्ल्यात इस्राईल आणि अमेरिकेने इराणच्या तीन महत्वाच्या आण्विक अड्ड्यांना उडवून टाकले. तरीही आता पाकिस्तान इस्राईलच्या विरोधात एकजूट होण्यासाठी कतार आणि अन्य मुस्लीम देशांना एकत्र करण्याच्या मोहिमेत सामील झाला आहे.
पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी आखात आणि मुस्लीम देशांसोबत एकजूट दाखवण्यासाठी गुरुवारी कतारच्या दौऱ्यावर जाण्याची घोषणा केली आहे. इस्राईलने दोन दिवसांपूर्वी कतारची राजधानी दोहा येथे मोठा हल्ला केल्याच्या पार्श्वभूमीवर हा दौरा आयोजित केला आहे. या हल्ल्यात हमासने दिलेल्या माहितीनुसार पाच अतिरेकी ठार झाले आहेत. शाहबाज यांच्या या पावलाने पाकिस्तान इस्राईलच्या हिट लिस्टवर येऊ शकतो. दोहात हमासच्या अतिरेक्यांची बैठक असल्याची गुप्त माहिती मिळताच इस्राईलने कतारची राजधानी दोहा येथे हवाई हल्ला केला. त्यात मंगळवारी हमासच्या किमान सहा नेत्यांना ठार केले आहे.
पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाने एका प्रसिद्धी पत्रकात सांगितले की, ‘पंतप्रधानांचा हा दौरा, दोहातील निवासी क्षेत्रांना टार्गेट बनवून केलेल्या इस्रायली भेकडाच्या हवाई हल्ल्यानंतर एकजूटता आणि क्षेत्रिय एकतेचे प्रतिक आहे. पंतप्रधानांसोबत एक उच्चस्तरिय शिष्ठमंडळ देखील जाणार आहे. ज्यात उपपंतप्रधान तसेच परराष्ट्रमंत्री इशाक डार यांचा देखील समावेश आहे. परराष्ट्र मंत्रालयाने सांगितले की हा दौरा कतारची सुरक्षा आणि सार्वभौमत्वाच्या प्रती पाकिस्तानचे भक्कम समर्थन आणि पश्चिम आशियातील शांतता आणि स्थिरतेसाठी त्यांच्या कठीबद्धतेला दर्शवते.
पाकचे पंतप्रधान शाहबाज शरीफ दोहा दौऱ्यात कतारचे आमीर शेख तमीम बिन हमद अल थानी यांची भेट घेणार आहेत. कतारच्या जनतेच्या प्रती पाकिस्तानच्यावतीने ते सहवेदना व्यक्त करणार आहेत. पाकिस्तान आणि कतार यांच्यात द्विपक्षीय संबंध आहेत आणि पाकिस्तानने आधीच इस्राईल हल्ल्याचा निषेध केला आहे. ही भेट केवळ एकजूटते पुरती मर्यादित असेल की दोन्ही देश कतारच्या संरक्षणासाठी कोणत्याही प्रकारच्या संरक्षण सहकार्याच्या शक्यतेवर चर्चा करतील हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.