Chandwad Accident : राहूड घाटात एलपीजी टँकर पलटी; चालकाचा मृत्यू, परिसरात भीतीचे सावट
esakal September 11, 2025 08:45 PM

चांदवड: मुंबई- आग्रा राष्ट्रीय महामार्गावरील राहूड घाटात भारत पेट्रोलियम कंपनीचा एलपीजी गॅस वाहतूक करणारा टँकर पलटी होऊन भीषण अपघात झाला. या अपघातात टँकरचालकाचा जागीच मृत्यू झाला असून, गॅसगळती सुरू झाल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले. या घटनेनंतर चांदवड-उमराणे महामार्ग तब्बल २० तासांहून अधिक काळ बंद ठेवावा लागला.

मालेगावच्या दिशेने जात असताना आधीच अपघातग्रस्त पोकलेन आणि ट्रक रस्त्यावर उभे होते. नियंत्रण सुटल्याने एलपीजी टँकर प्रथम ट्रकवर आदळला. त्यानंतर दुभाजक ओलांडून समोरील पोकलेनवर जाऊन धडकला. या धडकेची तीव्रता इतकी होती की टँकर पलटी होऊन गॅसची गळती सुरू झाली.

जीवितहानी टळली; पण धोका कायम

अपघातात चालकाचा मृत्यू झाला असला, तरी इतर कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र, गॅस गळतीमुळे आग व स्फोटाचा धोका कायम असल्याने परिस्थिती गंभीर बनली होती.

स्थानिकांची सुरक्षा वाढविण्याची मागणी

राहूड घाट परिसरात अपघातांची मालिका सुरू असून, दोन दिवसांपूर्वीही कंटेनर व पोकलेनचा अपघात झाला होता. त्याच वाहनांमुळे आजचा अपघात घडल्याची शक्यता आहे. त्यामुळे स्थानिक नागरिकांनी महामार्गावर सुरक्षा वाढविण्याची मागणी केली.

प्रशासनाचे आवाहन

तहसीलदार कुलकर्णी, पोलिस निरीक्षक वाघ आणि संबंधित यंत्रणांनी सतत लक्ष ठेवून परिस्थिती नियंत्रणात आणण्याचे प्रयत्न सुरू ठेवले. नागरिकांनी संयम राखून प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

प्रशासनाचा तातडीचा हस्तक्षेप

घटनेची माहिती मिळताच तहसीलदार मंदार कुलकर्णी, पोलिस निरीक्षक कैलास वाघ, महामार्ग वाहतूक शाखा, सोमा टोल कंपनीचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. अपघातग्रस्त भागातील महामार्ग तातडीने बंद करण्यात आला. चांदवड- मनमाडमार्गे आणि मालेगाव- देवळामार्गे वाहतूक वळविण्यात आली.

Mumbai E-Rickshaw News : मुंबईकरांची ई-रिक्षा-टॅक्सींना नापसंती! ८५ टक्के चालकांमध्ये अपुऱ्या सुविधांमुळे धास्ती

आपत्कालीन प्रतिसाद

भारत पेट्रोलियम कंपनीची आपत्कालीन प्रतिसाद टीम घटनास्थळी दाखल झाली. अग्निशामक दलाचे बंब, सोमा टोलचे तांत्रिक कर्मचारी, तसेच चांदवड, मालेगाव व मनमाड येथील अग्निशामक दल दिवसभर कार्यरत राहिले. गॅस गळती थांबविण्याचे प्रयत्न आणि टँकरमधील गॅस दुसऱ्या टँकरमध्ये स्थलांतरित करण्याचे जोखमीचे काम अखंड सुरू होते. पानेवाडी (नाशिक) आणि जळगाव येथील दोन पथकेही या कामात गुंतली होती.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.