भारतीय संघ आशिया कप स्पर्धेत चमकदार कामगिरी करत आहे. पहिल्याच सामन्यात युएई संघाला दिवसा तारे दाखवले. भारताने हा सामना 9 गडी राखून अवघ्या 27 चेंडूत संपवला. आशिया कप स्पर्धेत टीम इंडियाची विजयी आगेकूच सुरु असताना भारताच्या एका खेळाडूने मोठा निर्णय घेतला आहे. भारतीय संघात दिग्गज खेळाडूंचा भरणा असल्याने त्याला संघात काही स्थान मिळालं नाही. त्यामुळे त्याला आता काही काळ वाट पाहावी लागणार आहे. लवकरच हा खेळाडू विदेशी संघातून खेळतानी दिसू शकतो. आशिया कप 2025 स्पर्धेतून या खेळाडूला डावलण्यात आलं आहे. त्यानंतर त्याने हा निर्णय घेतल्याचं बोललं जात आहे. हा खेळाडू दुसरा तिसरा कोणी नसून अष्टपैलू वॉशिंग्टन सुंदर आहे. त्याने इंग्लंडच्या काउंटी चॅम्पियनशिपमध्ये शेवटच्या दोन फेरीत हॅम्पशरकडून खेळण्याची तयारी दर्शवली आहे. हॅम्पशरने सोशल मीडियावर एक पोस्ट करून याची माहिती दिली आहे.
वॉशिंग्टन सुंदर नुकताच झालेल्या इंग्लंड दौऱ्यात टीम इंडियाचा भाग होता. या दौऱ्यात त्याने चमकदार कामगिरी केली होती. 47 च्या सरासरीने 284 धावा केल्या होत्या. यात ओल्ड ट्रॅफर्ड येथे ठोकलेल्या शतकाचाही समावेश आहे. तसेच त्याने गोलंदाजीतही कमाल केली होती. त्याच्या या कामगिरीच्या जोरावर हॅम्पशरने त्याच्यासाठी संपर्क साधला असावा यात काही शंका नाही. हॅम्पशर 15 ते 18 सप्टेंबर दरम्यान कूपर असोसिएट्स काउंटी ग्राउंड, टॉनटनमध्ये समरसेटविरुद्ध सामना खेळेल. त्यानंतर 24 ते 27 सप्टेंबर दरम्यान युटिलिटा बाउलमध्ये चॅम्पियन सरेशी भिडेल. वॉशिंग्टन सुंदर या दोन्ही सामन्यात खेळणार आहे.
वॉशिंग्टन सुंदर 2022 नंतर पहिल्यांदाच काउंटी क्रिकेट खेळणार आहे. यापूर्वी काउंटी चॅम्पियनशिप आणि वनडे कपमध्ये लंकाशरकडून खेळला आहे. त्याने नॉर्थम्पटनशरविरुद्ध पहिल्या सामन्यात 5 विकेट घेतले होते. वॉशिंग्टन सुंदर भारताकडून 13 कसोटी सामने खेळला आहे. त्याने 44.2 च्या सरासरीने 752 धावा केल्या आहेत. यावेळी त्याने 1 शतक आणि 5 अर्धशतकं ठोकली आहे. त्याने 28.5 च्या सरासरीने 32 विकेट घेतल्या आहे. यात तीन वेळा 4 विकेट आणि एकदा पाच विकेट घेण्याचा विक्रम नोंदवला आहे. वेस्ट इंडिजविरुद्धच्या कसोटी मालिकेत संधी मिळेल की नाही? हे पाहणं देखील औत्सुक्याचं ठरणार आहे.