तरुणांना चिथावणी, भारतातून पलायन… या उपदेशकाला एड्सची लागण; नवी अपडेट काय ?
GH News September 11, 2025 02:33 PM

आपल्या वादग्रस्त वक्तव्यांसाठी नेहमीच चर्चेत असणारा कथित इस्लामिक उपदेशक झाकिर नाईक (Zakir Naik) सध्या सोशल मीडियावर चांगलाच चर्चेत आला आहे. त्याच्याबद्दलच्या एका बातमीने खळबळ माजली आहे. त्या बातम्यांमध्ये असा दावा केला जात आहे की झाकिर नाईकला एड्स (AIDS) झाला असून तो त्यावर उपचार घेत आहे. मात्र आता खुद्द झाकिर नाईकनेच पुढे येऊन या बातम्यांवर स्पष्टीकरण दिलं आहे.

झाकिर नाईकने या बातम्या पूर्णपणे फेटाळून लावल्या आहेत. सोशल मीडियावर पसरलेल्या बातम्या “खोट्या” आणि “द्वेष पसरवणाऱ्यांचा डाव” असल्याचे त्याने म्हटले आहे. मनी लाँड्रिंगचा आरोप झाल्यावर झाकिर नाईक हा 2017 साली भारतातून मलेशियाला पळून गेला.

मात्र आता तो पुन्हा चर्चेत आला आहे. एड्सच्या बातम्यांवर त्यानेच स्पष्टीकरण दिलं आहे. आपल्या आजाराबद्दलच्या बातम्या खोट्या असल्याचे झाकिर नाईकने ‘फ्री मलेशिया टुडे’शी बोलताना म्हटले. “हे बकवास आहे, ही खोटी बातमी आहे” असे ते म्हणाले. माझी प्रकृती पूर्णपणे ठीक आहे आणि या वृत्तांमध्ये कोणतेही तथ्य नाही असंही नाईक याने स्पष्ट केलं.

लोकप्रियतेमुळे पसरवली खोटी बातमी, वकिलांचा दावा

तर या अफवा पसरवणाऱ्यांच्या पार्श्वभूमीची चौकशी करत आहेत आणि लवकरच त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्याचा विचार करतील असे झाकिर नाईक याचे वकील अकबरदीन म्हणाले.

नाईक यांची लोकप्रियता हीच अशा अफवांसाठी कारणीभूत आहे, असा दावा वकिल अकबरदीन यांनी केला. नाईक यांना बदनाम करण्यासाठी “फेक न्यूज” वापरल्या जात आहेत, असा आरोप त्यांनी केल. मी जेव्हा शेवटचा नाईक यांना भेटलो तेव्हा त्यांची प्रकृती पूर्णपणे सामान्य होती असेही त्यांनी नमूद कें.

झाकिर नाईक कोण ?

झाकीर नाईक स्वतःला इस्लामिक उपदेशक आणि शांतताप्रिय म्हणून सादर करतो, परंतु त्याची भाषणे अनेकदा शांततेऐवजी हिंसाचाराला प्रोत्साहन देणारी, चिथावणीखोर असल्याचे दिसून येते. भारतात नाईक वॉन्टेड असून आणि त्याच्यावर अनेक गंभीर आरोप आहेत.

अंमलबजावणी संचालनालय (ईडी) आणि राष्ट्रीय तपास संस्था (एनआयए) या भारतातील दोन प्रमुख तपास संस्थांनी झाकीर नाईकला वॉन्टेड घोषित केले आहे. प्रक्षोभक भाषणे देणे, मनी लाँड्रिंग करणे आणि दहशतवादाला प्रोत्साहन देणे असे अनेक आरोप त्याच्यावर आहेत. मे 2019 मध्ये, ईडीने नाईकविरुद्ध दहशतवाद निधी प्रकरणात आरोपपत्र दाखल केले.

या आरोपपत्रात असा खुलासा झाला होता की, एजन्सीने नाईकच्या 193 कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या मालमत्तेची ओळख पटवली आहे. त्यापैकी 50 कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीची मालमत्ता जप्त करण्यात आली आहे. चौकशी आणि कायदेशीर कारवाई टाळण्यासाठी झाकीर नाईक 2017 मध्ये मलेशियाला पळून गेला आणि त्याच्याकडे तिथले नागरिकत्व देखील आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.