Thackeray Brothers : ठाकरेंचं ठरलं का? दसरा मेळाव्यात युतीचं तोरण बांधणार का? शिवाजी पार्कवर राज ठाकरे विचारांचं सोनं लुटणार का?
Saam TV September 11, 2025 06:45 PM

दसरा मेळावा २ ऑक्टोबर रोजी शिवाजी पार्कवर होणार

राज आणि उद्धव ठाकरे यांची गेल्या काही महिन्यांत राजकीय आणि कौटुंबिक स्तरावर अनेक भेटी

शिवसेना आणि मनसे युतीची घोषणा याच मेळाव्यात होणार का, याकडे सर्वांचं लक्ष

ठाकरे बंधूंच्या युतीचा महाराष्ट्राच्या आगामी निवडणुकीवर मोठा प्रभाव पडण्याची शक्यता

वैदेही काणेकर/विशाल गांगुर्डै, साम टीव्ही मुंबई

ठाकरे गटाचा दसरा मेळावा यंदाही शिवाजी पार्कवर पार पडणार आहे. मुंबई महापालिकेने ठाकरेंच्या २ ऑक्टोबर रोजी होणाऱ्या दसरा मेळाव्याला परवानगी मिळाली आहे. शिवसेनेच्या या दसरा मेळाव्याला मनसे अध्यक्ष राज ठाकरे उपस्थित राहणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. मात्र, या राज ठाकरेंच्या उपस्थितीबाबत अद्याप मनसेकडून दुजोरा मिळालेला नाही. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीमुळे ठाकरेंच्या दसरा मेळाव्याला विशेष महत्व प्राप्त झालं आहे. याच मेळाव्याला राज ठाकरेंची उपस्थिती लाभल्यास शिवसेना-मनसे युतीची घोषणा होणार का, याकडे साऱ्यांचं लक्ष असणार आहे.

२००५ सालानंतर ठाकरे बंधू दसरा मेळाव्यात एकत्र व्यासपीठावर आलेले नव्हते. मात्र, गेल्या काही महिन्यांपासून हिंदी सक्तीच्या मुद्द्यावरून ठाकरे बंधू एकत्र आल्याचे दिसले. काही कौटुंबीय कार्यक्रमातही दोघांची हजेरी पाहायला मिळाली. गणेशोत्सवात उद्धव ठाकरे अनेक दशकानंतर पहिल्यांदा राज ठाकरे यांच्या 'कृष्णकुंज' या निवासस्थानी पोहोचले. गणेशोत्सवातील कौटुंबीक भेटीनंतर अवघ्या काही दिवसांत उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांची पुन्हा भेट झाली. या भेटीत दोघांमध्ये आगामी निवडणुकीबाबत चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या 'शिवतीर्थ'वरील बैठकीदरम्यान ठाकरेसेनेचे संजय राऊत आणि अनिल परब उपस्थित होते. तर मनसेकडून बाळा नांदगावकर सहभागी झाले होते. या भेटीनंतर दोन्ही पक्षातील नेत्यांनी सकारात्मक भूमिका मांडली आहे. यामुळे शिवसेना आणि मनसे युतीच्या चर्चांना उधाण आलं आहे.

CP Radhakrishnan : सी. पी. राधाकृष्णन देशाचे नवे उपराष्ट्रपती; 'इतक्या' संपत्तीचे आहेत मालक

दसरा मेळाव्याचं व्यासपीठ हे ठाकरे गटाचं राजकीय व्यासपीठ आहे. शिवसेनेच्या दसरा मेळाव्याला अनेक वर्षांची परंपरा आहे. शिवसेनेकडून दरवर्षी शिवाजी पार्कवर दसरा मेळाव्याचं आयोजन केलं जातं. यंदाही ठाकरेंच्या शिवसेनेकडून शिवाजी पार्कावर २ ऑक्टोबर रोजी दसरा मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं आहे. महापालिकेनेही ठाकरेंच्या शिवसेनेला परवानगी देण्यात आली आहे. आगामी निवडणुकीच्या तोंडावर या मेळाव्याला विशेष महत्व प्राप्त झालंय. त्यात राज ठाकरे दसरा मेळाव्याला उपस्थित राहणार असल्याच्या चर्चेनेही अनेकांच्या नजरा मेळाव्यावर लागणार आहेत.

Petrol Diesel :...तर तुम्हाला पेट्रोल-डिझेल मिळणार नाही, सरकारने घेतला मोठा निर्णय

काही महिन्यांपूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीत राज ठाकरे यांनी महायुतीला पाठिंबा जाहीर केला होता. राज ठाकरे यांनी महायुतीच्या व्यासपीठावरून महाविकास आघाडीवर जोरदार टीका केली होती. त्याच काळात शिवाजी पार्कात झालेल्या महायुतीच्या सभेला मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचं तोंडभरुन कौतुक केलं होतं. त्यानंतर आगामी निवडणुकीच्या तोंडावर आता राज ठाकरे हे ठाकरे गटाच्या दसरा मेळाव्याला जाणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. त्यामुळे आगामी दसरा मेळाव्याच्या दिवशी अधिकृतपणे दोघे युतीची घोषणा करणार का, याकडे साऱ्यांचं लक्ष लागलेलं आहे. मनसे आणि ठाकरे गटाने युतीचं तोरण बांधल्यास राज्यातील राजकारणावरही मोठा परिणाम होण्याची मोठी शक्यता आहे.

Maharashtra Politics : काँग्रेसला आणखी एक मोठा धक्का; बडा नेता भाजपच्या वाटेवर, समीकरण बदलणार?

राज ठाकरे हे महाविकास आघाडीत येणार आहेत का, याबाबतही कोणतीही माहिती समोर आलेली नाही. दुसरीकडे ठाकरे गटाचे नेते महाविकास आघाडीच्या नेत्यांसोबत एकत्र आंदोलन करताना दिसत आहेत. उद्धव ठाकरेही महाविकास आघाडी, इंडिया आघाडीच्या नेत्यांच्या भेटीगाठी घेताना दिसत आहेत. उद्धव ठाकरे महाविकास आघाडीतून बाहेर पडण्याची शक्यता कमी असल्याचं बोललं जात आहे. आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाकरे बंधूंची राजकीय भूमिका अद्याप गुलदस्त्यात आहे. त्यामुळे दसरा मेळाव्यात माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे काय बोलतील, साऱ्यांचं लक्ष लागलेलं असणार आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.