कामोठेच्या रस्त्यावर पाण्याचे फवारे
esakal September 11, 2025 06:45 PM

कामोठेच्या रस्त्यावर पाण्याचे फवारे
‘सकाळ’च्या बातमीचा परिणाम; कामोठेवासीयांची धुळीपासून मुक्तता
पनवेल, ता. १० (बातमीदार) : कामोठे परिसरातील मुख्य रस्त्यावर गेल्या काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणावर धूळ उडत होती. खड्डे, वाळू आणि सिमेंटसदृश कचरा यामुळे वाहनचालक व पादचारी हैराण झाले होते. या धुळीमुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले होते तसेच श्वसनाचे आजार वाढण्याची शक्यता निर्माण झाली होती. दरम्यान, याबाबत ‘सकाळ’मध्ये बातमी प्रसिद्ध होताच प्रशासनाने याची दखल घेऊन रस्त्यांवर पाण्याचे फवारे मारण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे नागरिकांना धुळीपासून काहीसा दिलासा मिळाला आहे.
मानसरोवर रेल्वेस्थानकाकडे जाणाऱ्या मुख्य रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था झालेली आहे. या रोडची चाळण झाली असून कामोठे पोलिस ठाणे ते मानसरोवर कॉम्प्लेक्सदरम्यान डांबरी रस्ताच राहिलेला नाही. त्यावर खडी विखुरलेली आहे. त्यामुळे अनेकदा दुचाकीस्वार या ठिकाणी घसरून पडत आहेत. लहान-मोठे अपघात रोज घडत आहेत. यामुळे काही जण जखमीसुद्धा झालेले आहेत. पावसाळ्यात या खड्ड्यांमध्ये पाणी साचत असल्यामुळे वाहने जोरात आदळतात. यामुळे स्पेअर पार्ट खराब होत आहेत. त्याचबरोबर मणक्यालासुद्धा दणके बसत आहेत. यासंदर्भात कामोठे कॉलनी फोरमने कागदी होड्या सोडून आंदोलन केले होते. अनंत चतुर्थीच्या दुसऱ्या दिवशी एकता सामाजिक संस्था, फोरम, शेतकरी कामगार पक्ष आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेकडून या ठिकाणची खडी बाजूला सारून गांधीगिरी करण्यात आली होती. दरम्यान, गेल्या दोन दिवसांपासून पावसाने दडी मारली आहे. त्यामुळे मुख्य रस्त्यावरून वाहने जात असताना धूळ उडत आहे. कामोठेकरांना अप्रत्यक्षरीत्या धुळवड सप्टेंबर महिन्यात साजरी करावी लागत आहे. दरम्यान, सकाळमध्ये ‘कामोठ्यातील खड्ड्यांमधून आता धुरळा’ ही बातमी प्रसिद्ध झाल्यानंतर पनवेल महापालिकेने तत्काळ या गंभीर समस्येकडे लक्ष दिले. पालिका प्रशासनाने तत्परता दाखवत रस्त्यावर पाण्याचे फवारे मारणे सुरू केले आहे. त्यामुळे उडणाऱ्या धुळीवर नियंत्रण मिळाले असून नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. पालिकेच्या या तातडीच्या कृतीमुळे दोन दिवसांपासून धुळीच्या त्रासाने हैराण झालेले नागरिक सुटकेचा श्वास घेत आहेत. वाहनचालकांनाही आता धुक्यासारख्या धुळीतून वाहन चालवण्याच्या त्रासातून मुक्तता मिळाली आहे. स्थानिक नागरिकांनी ‘सकाळ’च्या बातमीला आणि त्यावर केलेल्या पालिकेच्या वेगवान कारवाईबद्दल समाधान व्यक्त केले आहे. यासंदर्भात पालिका अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता केवळ फवारे मारून धुळीवर नियंत्रण मिळवण्यापुरतेच न थांबता कायमस्वरूपी उपाययोजना केली जाईल, असे सांगण्यात आले.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.