जुन्नर, ता. १२ : जुन्नर येथे महसूल विभागातील तक्रार अर्ज व दावे तडजोडीने मिटविण्यासाठी १७ सप्टेंबरला लोक अदालत होणार आहे. तालुक्यातील १२ मंडल विभागातील १०४ जणांना त्यांच्या प्रकरणांच्या तडजोडीसाठी नोटीसा देण्यात आल्या आहेत. यामध्ये मंडल अधिकारी स्तरावरील २५ व तहसील स्तरावरील ७९ प्रकरणांचा समावेश असल्याचे तहसीलदार डॉ. सुनील शेळके यांनी सांगितले.
महसूल लोक अदालतीसाठी सर्व दाव्यांमधील पक्षकारांना तडजोडीसाठी १५ सप्टेंबरपर्यंत अर्ज दाखल करता येणार आहेत. त्याच दिवशी दाखल अर्जांची छाननी करून महसूल लोक अदालत पूर्वतयारी बैठक घेण्यात येणार आहे. यानंतर १७ सप्टेंबरला महसूल लोक अदालतीचे प्रत्यक्ष कामकाज होणार आहे.
‘‘पक्षकारांची तडजोड करण्याची मानसिकता असेल तर भविष्यात महसूल दाव्यांची संख्या कमी होईल. दिर्घकाळ चालणाऱ्या महसूली दाव्यांमध्ये तडजोड झाल्याने यंत्रणेवर पडणारा ताण कमी होतो. सहमतीने निकाल प्राप्त होत असल्याने वेळेचीही बचत होऊन पक्षकारांना समाधान मिळते. या दाव्यांमध्ये फीची आवश्यकता नसते त्यामुळे आर्थिक भार कमी होतो आणि न्याय मिळविणे तुलनेने सुलभ होते,’’ असे डॉ. शेळके यांनी या लोक अदालतीचे आवाहन करताना सांगितले.
महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम कलम १५० नुसार फेरफार मंजुरीच्या अधिकाराविषयी २५, १५५ नुसार नावामध्ये दुरुस्तीविषयी-१५, १३८ नुसार हद्दी ठरविण्याबाबत ३, कुळकायद्याविषयी १, १४३ नुसार रस्ते अडथळ्यांविषयी २० व एमसीएविषयी ४० अशी एकूण १०४ प्रकरणे यावेळी तडजोडीसाठी आहेत.