91037
सिंधुदुर्गनगरी ः येथे सेवा पंधरवडानिमित्ताने सिंधुदुर्ग भाजपची जिल्हास्तरीय कार्यशाळा पार पडली. यावेळी उपस्थित मान्यवर.
सिंधुदुर्गनगरीत सेवा पंधरवडा कार्यशाळा
भाजपकडून मार्गदर्शन; पंतप्रधानांच्या वाढदिवसानिमित्त विविध उपक्रमांचे नियोजन
सकाळ वृत्तसेवा
सिंधुदुर्गनगरी, ता. १२ ः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त १७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर या कालावधीत देशभरात सेवा पंधरवडा आयोजित करण्यात आला आहे. त्याअंतर्गत सिंधुदुर्ग भाजपची जिल्हास्तरीय कार्यशाळा काल (ता.११) सिंधुदुर्गनगरी येथील जिल्हा कार्यालय वसंतस्मृती येथे पार पडली.
कार्यशाळेचा शुभारंभ भारतमाता, डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी आणि पं. दीनदयाळ उपाध्याय यांच्या प्रतिमापूजनाने झाला. प्रास्ताविक व कार्यक्रमाची रूपरेषा जिल्हा संयोजक प्रसन्ना (बाळू) देसाई यांनी मांडली. या सेवा पंधरवड्यात जिल्ह्यात विविध सेवाभावी उपक्रम राबविण्यात येणार असून त्यात प्रामुख्याने बूथ स्तरावर स्वच्छता अभियान, वृक्षारोपण, रक्तदान शिबिर, दिव्यांगांचा सन्मान, विकसित भारत चित्रकला स्पर्धा, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जीवनावर प्रदर्शनी आणि युवा मोर्चातर्फे युथ मॅरेथॉनचा समावेश आहे. तसेच दिनदयाळ जयंती (२५ सप्टेंबर) आणि महात्मा गांधी जयंती (२ ऑक्टोबर) हे कार्यक्रम मंडल स्तरावर साजरे केले जाणार आहेत. या उपक्रमांतून भाजपची विचारधारा जनसामान्यांपर्यंत पोहोचविण्याचे उद्दिष्ट असल्याचे पदाधिकाऱ्यांनी सांगितले.
जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांनी केंद्रीय मंत्री नारायण राणे व पालकमंत्री नीतेश राणे यांच्या मार्गदर्शनाखाली हे सामाजिक उपक्रम यशस्वीपणे राबविण्याचे आवाहन केले. तर संघटन मंत्री शैलेंद्र दळवी यांनी, भाजप कार्यकर्ता वर्षाचे ३६५ दिवस समाजाशी संपर्कात राहतो. हे अभियान बूथ स्तरावर यशस्वी करणे आवश्यक आहे, असे मार्गदर्शन केले. महिला मोर्चा जिल्हाध्यक्षा श्वेता कोरगावकर यांनी सशक्त नारी अभियान राबविण्याची घोषणा केली. कार्यशाळेत जिल्ह्यातील सर्व १४ मंडलांमध्ये १५ सप्टेंबरपर्यंत कार्यशाळा आयोजित करण्याचे नियोजन करण्यात आले. स्वच्छता, आरोग्य शिबिरे, क्रीडा स्पर्धा, मान्यवरांचा सत्कार, दिव्यांगांना उपकरणांचे वाटप यांसारखे उपक्रम राबविण्याचे ठरले. तसेच भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या २० सप्टेंबरच्या वाढदिवसानिमित्त विशेष कार्यक्रमांचे नियोजनही करण्यात आले. या कार्यशाळेला युवराज लखमराजे भोसले, विजयकुमार मराठे, श्वेता कोरगावकर, महेश सारंग, रणजीत देसाई, संदीप साटम, शारदा कांबळे, अशोक सावंत, संध्या तेरसे उपस्थित होते. जिल्हा सरचिटणीस रणजीत देसाई यांनी आभार मानले. या सेवा पंधरवड्यातील नियोजनामुळे सिंधुदुर्ग जिल्हा राज्यात अग्रक्रमावर राहील, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.