Nagpur Accident : भयंकर! उड्डाणपुलावर स्कूल व्हॅनची बसला जोरात धडक, विद्यार्थिनी अन् चालकाचा मृत्यू, ८ विद्यार्थी जखमी
Saam TV September 13, 2025 06:45 PM
  • मानकापूर उड्डाणपुलावर स्कूल व्हॅन व बसचा भीषण अपघात

  • दोन जणांचा मृत्यू, आठ विद्यार्थी गंभीर जखमी

  • फिटनेस नसलेल्या गाड्यांवरून पालक संघटना संतप्त

  • आरटीओ आणि प्रशासनाच्या निष्काळजीपणावर प्रश्नचिन्ह

नागपूरच्या मानकापूर उड्डाणपुलावर झालेल्या भीषण अपघाताने संपूर्ण शहर हादरून गेले आहे. शालेय विद्यार्थ्यांनी भरलेल्या व्हॅनला समोरून आलेल्या स्कूल बसने जोरदार धडक दिली. या अपघातात दोन जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून आठ विद्यार्थी गंभीर जखमी झाले आहेत. मृतांमध्ये भवन्स विद्यालयातील सहावीतील विद्यार्थिनी सानवी देवेंद्र खोब्रागडे आणि स्कूल व्हॅन चालक ऋतिक कनोजीया यांचा समावेश आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ही दुर्घटना मानकापूर उड्डाणपुलावर झाली. मागील काही दिवसांपासून उड्डाणपुलाच्या दुरुस्तीचे काम सुरू असल्याने या मार्गावर वाहतूक कोंडी होत होती आणि एका बाजूने दोन्ही दिशेने वाहतूक सुरू होती. त्याचवेळी कोराडी येथून भवन्स विद्यालयाच्या विद्यार्थ्यांना घेऊन जाणारी व्हॅन मानकापूर पुलावरून जात होती. याचवेळी विरुद्ध दिशेने नारायणा विद्यालयाची रिकामी बस वेगाने येत होती. बस चालकाचा वेग आणि बेपर्वाईमुळे समोरासमोर धडक होऊन हा अपघात झाला.

Nagpur : नागपूरात जिल्हा सत्र न्यायालयाच्या न्यायाधीशांच्या कारला आग | VIDEO

धडकेचा जोर इतका जबरदस्त होता की व्हॅनचा पुढचा भाग अक्षरशः चेंदामेंदा झाला. विद्यार्थ्यांनी ओरडण्याचा आवाज, आजूबाजूला पसलेला गोंधळ आणि अपघाताचे दृश्य पाहून स्थानिक नागरिक धावून आले. तातडीने सर्व जखमींना जवळच्या रुग्णालयात हलवण्यात आले. आठ विद्यार्थ्यांवर उपचार सुरू असून त्यातील काहींची प्रकृती चिंताजनक असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. मृत विद्यार्थिनी सानवी आणि व्हॅन चालक ऋतिक यांना आयसीयूमध्ये दाखल करण्यात आले होते, मात्र डॉक्टरांचे प्रयत्न निष्फळ ठरले.

Nagpur : दह्यामुळे कॅन्सर? नागपुरात ४ हजार किलो दही जप्त,नेमका प्रकार काय? |पाहा VIDEO

या अपघातानंतर पालक संघटना आक्रमक झाल्या असून वाहतूक सुरक्षेच्या प्रश्नांकडे लक्ष वेधले आहे. शालेय विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ करून फिटनेस नसलेल्या गाड्या रस्त्यावर का धावत आहेत, असा संतप्त सवाल पालकांनी उपस्थित केला. विशेषतः आरटीओ प्रशासन आणि वाहतूक विभागाकडे बोट दाखवले जात आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.