मुंबईतील 100 वर्षांहून अधिक जुन्या असलेल्या एल्फिन्स्टन रोड ओव्हरब्रिज (ROB) पाडण्याचे काम काल संध्याकाळपासून (12 सप्टेंबर) सुरू झाले आहे. ब्रिटिशकालीन असलेला हा पूल परळ आणि प्रभादेवीला जोडतो. मात्र आता हा पूल पाडून शिवडी-वरळी एलिव्हेटेड कनेक्टर प्रकल्पांतर्गत एक नवीन डबल-डेकर पूल बांधला जाईल. प्रभादेवी येथील एल्फिन्स्टन ब्रिज हा 1913 साली बांधण्यात आला होता तो अखेर मध्यरात्रीपासून बंद करण्यात आला . 1913 साली बांधण्यात आलेला पुलाचा नोंद असलेला दगड अजूनही पुलावर पाहायला मिळत आहे. पण हा पूल पाडून नवा बांधण्यात येत असून मुंबईसाठी हा एक मोठा बदल आहे, ज्यामुळे पूर्व-पश्चिम कनेक्टिव्हिटी सुधारेल आणि वाहतुकीचा ताण कमी होईल. पण यामुळे वाहतुकीत अनेक बदल होणार असून काही ठिकाणी कोंडीही होऊ शकते. पर्यायी मार्गांचा अवलंब करण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.
का पाडला जातोय पूल ?
मुंबई वाहतूक पोलिसांनी 11 सप्टेंबर रोजी एल्फिन्स्टन आरओबी बंद करण्यासाठी अधिकृत सूचना जारी केली आणि पर्यायी वाहतूक योजना देखील प्रकाशित केली. यापूर्वी हा पूल 25 एप्रिलपासून बंद करण्याचे नियोजन होते, परंतु वाहतूक कोंडी आणि गैरसोयी लक्षात घेता हा निर्णय पुढे ढकलण्यात आला. अखेर कालपासून पुलाचे पाडकाम सुरू करण्यात आले आहे. दादर, लोअर परळ, करी रोड आणि भारत माता परिसर प्रभावित होणार आहेत. या योजनेचा उद्देश लोकांच्या हिताचा असल्याचेही म्हटले जात आहे. सुरक्षितता वाढविण्यासोबतच, गर्दी कमी करणे हे देखील या पूल बांधण्याचे एक उद्दिष्ट आहे.
वाहतूक मार्गात बदल, जाणून घ्या सविस्तर
परळ आणि प्रभादेवी परिसरास जोडणारा प्रभादेवी स्थानकावरील पूल बंद केल्याचा फटका एसटीच्या प्रवाशांना बसणार आहे. पूल बंद केल्यामुळे परळ आगारातून सुटणाऱ्या एसटीच्या मार्गात बदल करण्यात येणार आहे. परिणामी, या बसच्या तिकिटात 10 रुपयांची वाढ केली जाणार आहे. प्रभादेवी स्थानकावरील पूल साधारण 2 वर्षांसाठी बंद असणार आहे. त्यामुळे परळ आगारात दादर येथून येणाऱ्या बस मडके बुवा चौक (परळ टी.टी. जंक्शन), डॉ. बाबासाहेब आंबेडकर रोडने-भारतमाता जंक्शन-संत जगनाडे चौक येथून उजवे वळण घेऊन साने गुरुजी मार्गाने चिंचपोकळी ब्रिजवरून एन.एम. जोशी मार्गाने आगारात येतील व त्याच मार्गाने परत मार्गस्थ होणार आहेत. तर ई शिवनेरी व शिवनेरी बसकरिता दादर ते परळ जाताना दादर टी.टी. सर्कल, टिळक ब्रिज- कबुतर खाना उजवे वळण घेऊन भवानी शंकर रोड, शारदाश्रम, गोपिनाथ चव्हाण चौक मार्गे परळ बस स्थानकात जाणार असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले..
तसेच पूर्वेकडून पश्चिमेकडे जाणाऱ्या वाहनांकरीता दादर पूर्वकडून दादर पश्चिमेकडे आणि दादर मार्केटकडे जाणाऱ्या वाहन चालकांना टिळक पुलाचा वापर करावा लागेल. परळ पूर्वकडून प्रभादेवी आणि लोअर परळला जाणाऱ्या वाहन चालकांना करी रोड पुलाचा वापर सकाळी ७ ते दुपारी ३ या वेळेत करावा लागेल. परळ, भायखळा पूर्वकडून प्रभादेवी, वरळी, सागरी किनारा मार्ग आणि सागरी सेतू्च्या दिशेने जाणाऱ्या वाहन चालकांना चिंचपोकळी पुलाचा वापर करावा लागेल. पश्चिमेकडून पूर्वेकडे जाणाऱ्या वाहनांकरीता दादर पश्चिमेकडून दादर पुर्वकडे जाणाऱ्या वाहन चालकांना टिळक पुलाचा वापर करावा लागणार आहे.
प्रभादेवी आणि लोअर परळ पश्चिमेकडून परळला, टाटा रुग्णालय, केईएम रुग्णालयाकडे जाणाऱ्या वाहन चालकांना करी रोड पुलाचा वापर दुपारी ३ ते रात्री ११ वाजेपर्यंत करावा लागणार आहे. सागरी किनारा मार्ग आणि सागरी सेतू तसेच प्रभादेवी, वरळीकडून परळ, भायखळा पूर्वकडे जाणाऱ्या वाहन चालकांना चिंचपोकळी पुलाचा वापर करावा लागणार आहे. जुन्या ब्रिजचं बांधकाम पाडायला साधारण 60 दिवस म्हणजे दोन महिने लागणार असून नवीन ब्रिजच्या संपूर्ण कामाला दीड वर्ष लागणार आहे म्हणजे साधारण 2 वर्षानंतर नवीन एल्फिन्स्टनचा दुमजली ब्रिज प्रभादेवी येथे मुंबईकरांना उपलब्ध होईल.
तर जबाबदार कोण?
लोकांना चालण्यासाठी पर्यायी मार्ग बनवला असताना का सुरु केला जात नाही असा स्थानिकांचा सवाल आहे. आमचा विकासाला विरोध नाही पण पूल पाडताना आमच्या इमारती पडणार नाहीत याची काळजी घ्यावी आमच्या देखील जुन्या इमारती आहेत पूल पाडताना त्याला आम्हाला धक्का लागला तर जबाबदार कोण? असा प्रश्नही स्थानिक नागरिकांनी विचारला आहे.