सांगली : राजकीय हस्तक्षेपातून बांधकाम उपविभागातील अभियंत्याने (Engineer) आपलं आयुष्य संपवल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. सांगलीत (Sangli) कृष्णा नदीच्या पात्रात एका कनिष्ठ अभियंता तरुणाचा मृतदेह तरंगताना आढळून आल्याने जिल्ह्यात खळबळ उडाली. अवधूत अशोक वडार (वय 27) असे मयत तरुणाचे नाव असून हा तरुण जत पंचायत समितीच्या बांधकाम उपविभागामध्ये कनिष्ठ अभियंता म्हणून नोकरीस होता. मात्र, सरकारी कामात राजकीय हस्तक्षेप करत दबाव टाकण्यात आल्याने अवधूतने हे टोकाचं पाऊल उचलल्याचा आरोप त्याच्या कुटुंबीयांकडून करण्यात आला आहे. याप्रकरणी, पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे, मात्र हा घातपात असल्याची शंका अवधूतच्या कुटुंबीयांनी व्यक्त केली आहे.
गेल्या सहा महिन्यांपासून जतमधील महिला माजी जिल्हा परिषद सदस्यांचा पती असलेले सुनील पवार, आमदाराचा पीए म्हणवणारा एकजण आणि जतच्या पंचायत समितीमधील इतर कर्मचाऱ्यांकडून अवधूतवर शासन कामात दबाव टाकला जात होता, असा आरोप अवधुतच्या कुटुंबाने केलाय. अवधूत या दबावामुळे काही दिवसांपासून तणावात होता, तसेच त्याचे मानसिक संतुलन देखील बिघडले होते असा आरोप अवधूतच्या चुलत्याने केलाय. याच कारणातून अवधूतने एकतर आत्महत्या केली असावी किंवा त्याचा घातपात झाला असावा असाही संशय कुटुंबांनी व्यक्त केला आहे. जोपर्यंत जतमधील ज्याच्या विरोधात आम्ही तक्रार दिलीय त्या व्यक्तींच्यावर गुन्हा दाखल होत नाही, तोपर्यंत अवधूतचा मृतदेह स्वीकारणार नाही, असा पवित्रा त्याच्या कुटुंबांने घेतला आहे.
सांगली शहर पोलीस स्टेशन हद्दीमध्ये सकाळी दहाच्या सुमारास सांगली स्पेशल रेस्क्यू फोर्स आपत्कालीन पथकास कृष्णा नदीपात्रात नवीन पुला खाली पुरुष जातीचा मृतदेह तरंगत असल्याची माहिती मिळाली होती. सांगली शहर पोलीस ठाण्याचे पोलीस अंमलदार यांनी मृतदेहाची पाहणी करून मृतदेह सांगली शासन रुग्णालय येथे स्पेशल रेस्क्यू फोर्सच्या मदतीने पाण्यातून बाहेर काढून सांगली शासन रुग्णालयात पाठवला होता. वडार यांच्या नातेवाईकांना माहिती मिळताच नातेवाईकांनी सांगली सिव्हिल हॉस्पिटल येथे येऊन मृतदेहाची पाहणी करत शहानिशी केली. पण, अवधूतचा घातपात झाला असावा असाही संशय त्याच्या कुटुंबांनी व्यक्त केला आहे. तसेच जतमधील ज्याच्या विरोधात तक्रार दिलीय त्या व्यक्तींच्या नावावर गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत अवधूतचा मृतदेह स्वीकारणार नाही असा पवित्रा त्याच्या कुटुंबांने घेतला आहे.
दरम्यान, अवधूतच्या कुटुंबांनी ज्या सुनील पवार या व्यक्तीवर नाव घेऊन आरोप केले आहेत, त्यांच्याशी संपर्क साधला असता आम्ही कोणत्याही चौकशी तयार आहोत. अवधूतच्या कुटुंबाने माझ्यावर कोणत्या आधारे आरोप केले हे मला कळले नाही. मात्र, अवधूतच्या मृत्यूने आम्हालाच दु: ख झाले आहे, असे त्यांनी एबीपी माझाच्या प्रतिनिधीशी फोनवरून बोलताना म्हटले.
आणखी वाचा