अहोरात्र काबाडकष्टांची माती
esakal September 14, 2025 03:45 AM

वर्षभराच्या मेहनतीवर पाणी
पालघर जिल्ह्यातील चिकूवर बुरशीचा प्रादुर्भाव
वाणगाव, ता. १३ (बातमीदार) : पालघर जिल्ह्यातील वसई, पालघर, डहाणू, घोलवड, बोर्डी, तलासरी, जिल्ह्याच्या किनारपट्टी भागात चिकूची मोठ्या प्रमाणात लागवड केली जाते. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करताना जगभरात चिकूला प्रसिद्धी मिळावी, यासाठी जिल्ह्यातील बागायतदार, शेतकरी धडपडत आहेत; मात्र वातारणात सातत्याने होणारे बदल, अवकाळीनंतर बुरशीजन्य रोगांच्या प्रादुर्भावाने वर्षभराची मेहनत वाया गेली आहे.
ऑगस्ट, सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात डहाणूसह संपूर्ण जिल्ह्याला मुसळधार पावसाने झोडपले होते. अशातच चिकूच्या फळावर बुरशीजन्य रोगाची लागण झाली आहे. मुसळधार पावसात औषध फवारणी करणे शक्य होत नसल्याने मोठ्या प्रमाणात फळे गळून पडली आहेत. जिल्ह्यातील जवळपास ६० टक्के शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे या संकटातून सावरण्यासाठी नुकसानभरपाईसह चिकू विम्याची शंभर टक्के रक्कम तत्काळ उपलब्ध करून देण्याची मागणी शेतकऱ्यांमधून होत आहे.
-------------------------------------------
उत्पादकांसमोरील अडचणी
- चिकूच्या झाडाला फूल आल्यानंतर फळ तयार होण्यासाठी सात ते आठ महिने लागतात. चिकूचे झाड बहुवर्षायू असल्याने दुसरी लागवड किंवा भाजीपाला पिके करता येत नाहीत. अनेक वर्षांपासून प्रेमाने जोपासलेली झाडे कापून टाकता येत नाहीत. अशातच मुसळधार पावसाने चिकू बागांना झोडपून काढले आहे. गेल्या काही वर्षांपासून सातत्याने शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होत आहे.
- डहाणूच्या घोलवड चिकूला भौगोलिक मानांकन प्राप्त असून जगाच्या नकाशावर स्थान मिळाले आहे. घोलवडचा चिकू हा मुंबईसह इतर मोठ्या शहरांमध्ये चिकू फळाला मोठ्या प्रमाणात मागणी आहे; पण बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव वाढल्यामुळे मजूरवर्गासाठी कामच नसल्याने समुद्रात मासेमारी करण्यासाठी जात आहेत. त्यामुळे चिकू बागायतदारांसमोर मोठे संकट उभे राहिले आहे.
़़़़़़़़़़़़़़़़़ः-----------------------------
संशोधन केंद्राची गरज
डहाणू, पालघर, तलासरी येथील चिकू बुरशीजन्य रोगाच्या भोवऱ्यात सापडला आहे. जिल्ह्यातील चिकूला फायटोप्थोरा पाल्मीव्होरा बुरशी रोगामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. अनेक वर्षांपासून त्यावर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रभावी औषधही सापडलेले नाही. त्यामुळे संशोधन होण्याची नितांत गरज असून डहाणूमध्ये चिकूवर संशोधन करणारे केंद्र उभारावे, अशी मागणी होत आहे.
-------------------------------------------------------
फायटोप्थोरा पाल्मीव्होरा बुरशीमुळे चिकूची फुले, छोटी फळे गळून पडली आहेत. त्यामुळे पुढील दोन हंगामाचे नुकसान झाल्याने आगामी काळात उत्पादन घटण्याची शक्यता अधिक आहे. त्यामुळे शंभर टक्के नुकसानभरपाई जाहीर करून विम्याची रक्कम देऊन मदतीचा हात द्यावा.
- यज्ञेश सावे, चिकू उत्पादक शेतकरी, बोर्डी
-------------------------------------------------------
पावसाळ्यामध्ये रोगाचा प्रादुर्भाव चिकू फूलकळी तसेच विविध आकाराच्या वाढणाऱ्या फळावर आढळून येतो. रोगाच्या प्रादुर्भावामुळे फळे निस्तेज, कडक होतात. विद्यापीठाने शिफारस केलेल्या उपाययोजना फळ बागायतदारांनी प्रक्षेत्रावर राबविल्यास फळगळ रोगाचा अटकाव होण्यास मदत होईल.
- डॉ. अंकुर ढाणे, कीटकशास्त्रज्ञ, कृषी संशोधन केंद्र, पालघर

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.