नसरापूर, ता. १२ : भोर विधानसभा मतदारसंघातील मुळशी व भोर तालुक्यातील पाच रस्त्यांच्या कामासाठी पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (पीएमआरडीए) अंतर्गत १३२ कोटी ५० लाख रुपये मंजूर झाल्याची माहिती आमदार शंकर मांडेकर यांनी दिली.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार व एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली मुळशी व भोर तालुक्यातील पाच रस्त्यांच्या कामांना निधी मंजूर झाला आहे. त्यामध्ये मुळशी तालुक्यातील घोटावडे हनुमान चौक ते चाले हा जिल्हा मार्ग रस्ता सुधारणा करण्यासाठी ३५ कोटी रुपये, जांबे ते सांगवडे हा रस्ता सुधारणा करण्यासाठी ११ कोटी रुपये, भुकूम हायवे रस्ता ते आहिरे रस्ता सुधारणा करण्यासाठी १७ कोटी ५० लाख रुपये, संभवे- रावडे- भादस- करमोळी रस्ता सुधारणा करण्यासाठी ६० कोटी रुपये, असा निधी मुळशी तालुक्यासाठी मंजूर झाला असून, भोर तालुक्यातील राष्ट्रीय महामार्ग ४८ ते किकवी- केंजळ या रस्त्याच्या सुधारण्यासाठी ९ कोटी रुपये मंजूर झाले आहेत.