>> वर्णिका काकडे
केंद्र सरकारने मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिला. त्यानंतर पार पडलेल्या मराठी साहित्य संमेलनात संमेलनाध्यक्ष तारा भवाळकर यांनी मराठी भाषेच्या समृद्धतेचे, संस्कृतीचे अनेक पैलू मांडले. यातील एक महत्त्वाचा पैलू म्हणजे भाषेचे लोकसंस्कृती, लोकसाहित्याशी जोडलेले असणे. किंबहुना संस्कृती-साहित्यातच भाषेची पाळंमुळं घट्ट रुजलेली असतात आणि प्रांतवार तिचं प्रारूप बदलत समोर येतात. भाषेचा हजारो वर्षांचा इतिहास चाळताना अनेक बोलींची वळणं आपल्याला खुणावतातच. या बोली म्हणजे भाषेची खरी समृद्धता. बोलींचं लोकसंस्कृतीशी असणं जसं विलग करता येत नाही तसंच ग्राम्यसंस्कृतीशी असणंही. महाराष्ट्र आणि लगतच्या सर्व प्रदेशांमध्ये मराठीच्या असंख्य बोलीभाषा दिसून येतात. यातील काही बोली आजही आपलं अस्तित्व टिकवून आहेत तर काही बोली काळाच्या ओघात गुडूप झाल्या आहेत. त्यातील काही शब्द त्यांच्या भूतकाळातील अस्तित्वाच्या खुणा दर्शवत राहतात. काही बोलींची टिकून राहण्याची धडपड म्हणजे केवळ भाषा टिकून राहावी यासाठी नाही तर भाषेसोबत तिथली संस्कृती, साहित्य, प्रथा, परंपरा सारंच टिकण्यासाठीची धडपड आहे. महाराष्ट्र राज्याच्या विविध भागांमध्ये अनेक बोलीभाषा प्रचलित आहेत. अगदी प्रांतवार पाहिले तरी कोकणी, मराठवाडी, वर्हाडी, देशावरील बोली, आगरी, खानदेशी, माळवी, चंदगडी, अहिराणी, मालवणी, झाडी, दखनी, भिली, कातकरी, वारली, वाडवळी अशा अनेक मुख्य बोली दिसून येतात. यात लुप्त होऊ पाहणार्या तंजावर मराठी, नंदभाषा, लेवा, बेलदार, सिद्दी, पावरा, मांगेली अशा बोलीही आहेत. या प्रत्येक बोली त्या विशिष्ट समुदायाशी, प्रदेशाशी निगडीत आहेत. काळाच्या ओघात झालेली स्थित्यंतरे, स्थलांतरे यामुळे या बोलीतील शब्दांची झालेली देवाणघेवाण ते बोलीतील शब्दच कायमस्वरूपी नष्ट होणे असेही परिणाम दिसतात. बोलीभाषेचा वेध घेताना सांस्कृतिक, सामाजिक स्थित्यंतरं अगदी ठळकपणे दिसतात. ज्यांची नोंद घेणे आवश्यक ठरते. म्हणूनच त्या-त्या प्रदेशाच्या सांस्कृतिक, भौगोलिक, ऐतिहासिक स्वरूपानुसार विकसित झालेल्या बोलीभाषा, त्यांची वैशिष्टय़े, त्यांचे स्वरूप, सद्यस्थिती, त्या अनुषंगाने तेथील संस्कृती, साहित्य, कला, परंपरा या सगळ्याचा वेध या सदरातून आपण घेणार आहोत.