फेसबुक पोस्टवरून किरण माने-भाजप पदाधिकाऱ्यांमध्ये वादंग
कल्याण, ता. १३ (बातमीदार) : अभिनेते किरण माने यांच्या समाजकमाध्यमावरील एका पोस्टमुळे पुन्हा नवा वाद निर्माण झाला आहे. नेपाळमध्ये माजलेल्या हिंसाचाराचा संदर्भ घेऊन त्यांनी अप्रत्यक्षपणे भाजप नेत्यांवर निशाणा साधला. यावरून डोंबिवलीचे भाजप पदाधिकारी संदीप माळी यांनी किरण मानेंना फोन केला असता त्यांच्यात शाब्दिक चकमक झाली. यासंदर्भात मानेंनी फेसबुकरून नाव न घेता संपर्क क्रमांक टाकून माहिती दिली आहे.
‘मला फोन करून शिवीगाळ करण्यात आली असून, हत्येची धमकी दिली गेली. अर्थात हा फोन मी प्रसिद्ध करणार नाही. कारण समाजात प्रक्षोभ होईल. मी कोणत्याही मंत्र्याकडे दाद मागणार नाही किंवा पोलिसांत तक्रारही करणार नाही. पोस्टमधील नंबर आहे त्याचा बोलविता धनी शोधावा. मला जर काही झाले तर मी समाजासाठी निधड्या छातीने सामोरा जाईन. पण नंतर मात्र माझ्या बलिदानाला न्याय मिळाला पाहिजे. महाराष्ट्र धर्मानं मोकळा श्वास घ्यायला पाहिजे. मग आपण खूश,’ अशा प्रकारची माहिती मानेंनी पोस्टद्वारे आपल्या चाहत्यांना दिली आहे.
किरण माने यांनी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लक्ष्य करून पोस्ट टाकली होती. नेपाळसारखी घटना भारतात घडली तर कोणालाही सोडणार नाही, अशी पोस्ट टाकल्याने मानेंना कॉल केला असल्याचे संदीप माळी यांनी सांगितले. मात्र त्यांनी माझ्यावर केलेले आरोप पूर्णपणे चुकीचे असून, शिवीगाळ फक्त आमच्या दोघांत झाली होती. मी कोणत्याही समाज अथवा नेत्याबद्दल अपशब्द वापरलेले नाहीत. ती रेकॉर्डिंग क्लिप माझ्याकडे असून किरण माने खोटे आरोप करीत असल्याचा खुलासा संदीप माळी यांनी केला आहे. यासंदर्भात त्यांनी ही रेकॉर्डिंग आपल्या फेसबुक व्हिडिओद्वारे प्रसारित केली आहे.