Marathi News : मराठी इंडस्ट्रीमधील सुंदर आणि गुणी अभिनेत्री प्रिया मराठेचं 31 ऑगस्टला कॅन्सरमुळे निधन झालं. 38 व्या वर्षी अकस्मात झालेल्या तिच्या मृत्यूचा धक्का अनेकांना बसला. नुकतंच प्रियाचा चुलत भाऊ, अभिनेता आणि सहकलाकार सुबोध भावेने तिच्या काही आठवणी मुलाखतीत शेअर केल्या. बहिणीच्या आठवणी सांगताना सुबोध खूप भावुक झाला होता.
सुबोधने नुकतीच लोकमत फिल्मीला मुलाखत दिली. प्रियाची शेवटची मालिका तू भेटशी नव्यानेमध्ये त्या दोघांची एकत्र काम केलं होतं. तिच्या बालपणीच्या आणि एकत्र काम करतानाच्या अनेक आठवणी त्याने यावेळी शेअर केल्या.
तो म्हणाला की,"प्रिया ही माझ्या काकांची मुलगी. तिचा बाबा खूप लवकर गेला. त्यावेळी ती खूप लहान होती. तिचा बाबा म्हणजे एक चैतन्य होतं. तो येणार असला की आमच्याकडे उत्साहाचं वातावरण असायचं. प्रियाचा मोठा भाऊ विवेक हा माझ्या वयाच्या आसपास आहे. त्यामुळे आम्ही एकत्र खेळलो. प्रिया आणि माझ्यात बारा वर्षांचं अंतर आहे. त्यामुळे माझी शाळा होईपर्यंत ती खूपच लहान होती. त्यानंतर माझं जाणं तितकंस झालं नाही पुढे व्यापामुळे काकाचंही येणं कमी झालं. पण आमचा संपर्क होता. पण काका गेल्यानंतरही प्रिया खूप छान होती. तिचा स्वभाव अगदी काकासारखा होता."
"प्रिया आणि मी कळत नकळत मालिकेत एकत्र काम केलं. त्यानंतर आम्ही दोन सिनेमे एकत्र केले. त्यानंतर मी तू भेटशी नव्याने या मालिकेत एकत्र काम केलं. त्यात ती निगेटिव्ह भूमिका करत होती. तिला सेटवर बघून मला इतका आनंद झाला कारण त्या आधी तिला कॅन्सर डिटेक्ट झाला होता. त्यातून बरी होऊन ती नुकतीच बाहेर पडली होती. त्यानंतर तिने नाटकाचे प्रयोग केले, अमेरिकेचा दौरा केला. त्यानंतर ती माझ्यासमोर आली तेव्हा ती एकदम फ्रेश दिसत होती. दिसायला अत्यंत सुंदर असूनही तिने खलनायिका उत्तम वठवली. मी आजही सेटवर गेलो तर माझे सीन पाठ नसतात. पण प्रियाचं सेटवर यायची तेव्हा तिचे सगळे सीन पाठ असायचे. ती पटापट सीन करायची. एक सहकलाकार आणि भाऊ म्हणून मला तिचं खूप कौतुक होतं."
"आजर्पणातूनही ती खूप एनर्जीने परत आली. ती फायटर होती. गेल्या वर्षी मालिकेच्या सेटवर प्रिया मालिका करणार नसल्याचं कळलं. मग नंतर मला कळलंच की तिचा कॅन्सर परत आला आहे. मध्ये मध्ये मी तिला फोन मेसेज करायचो पण शेवटी शेवटी ती नीट बोलेनाशी झाली. मग मी शंतनूशी मेसेजवर बोलू लागलो. शेवट्पर्यंत तिने कोणालाच भेटू दिलं नाही. मला वाटतं अशा अवस्थेत तिच्या जवळच्या लोकांनी तिला पाहू नये अशी तिची इच्छा होती. ती कधीच तिच्या आजाराचं रडगाणं गायली नाही. या सगळ्या प्रवासात ती पुन्हा परत येईल असं मला वाटत होतं. मी तिच्या फोनची वाट बघत होतो की दादा मी काम सुरु केलं पण शेवटी कॅन्सरने तिचा घास घेतलाच."
"शंतनूने तिची शेवटपर्यंत साथ दिली. त्यांचं एकमेकांवर खूप प्रेम होतं. ती जायच्या काही दिवस आधीच त्याने पुन्हा काम सुरु केलं होतं. तिचा आजार परत आल्यावर तो पूर्णवेळ तिच्या बरोबर होता. पण नुकतंच त्याने काम सुरु केलं. त्याचा कमबॅकचा एपिसोड ती जायच्या आदल्या दिवशी त्याचा एपिसोड मालिकेत दिसणार होता. मला असं कळलं की तिने तो पहिला. दुसऱ्या दिवशी पहाटे तिने तिच्या आईसमोर आणि शंतनूसमोर जीव सोडला असं मला समजलं." असा खुलासा त्याने केला.