‘सैनिक हो आमच्यासाठी’ कार्यक्रमातून सैनिकांशी संवाद
कळवा, ता. १३ (बातमीदार) : देशाच्या संरक्षणासाठी जीवाची बाजी लावणाऱ्या, डोळ्यात तेल टाकून अहोरात्र सीमेवर लढणाऱ्या आणि देशाचे संरक्षण करणाऱ्या लढवय्ये भारतीय सैनिकांची माहिती विद्यार्थ्यांना मिळावी, विद्यार्थ्यांना लहानपणापासूनच देशभक्तीची गोडी निर्माण व्हावी, या हेतूने कळव्यातील कै. गोपाळराव पाटील शिक्षण संस्थेच्या शिशुविहार विद्यामंदिरमध्ये शनिवार, (ता. १३)ला ‘सैनिक हो आमच्यासाठी’ हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
या कार्यक्रमातून ‘सैनिकांचे अंतरंग : एक मुलाखत’ या उपक्रमातून कळव्यात आपल्या घरी सुट्टीसाठी आलेल्या श्रीनगर गुलबर्गा येथे देशासाठी कामगिरी बजावत असणाऱ्या मेजर दत्ता पवार यांच्याशी छोट्या विद्यार्थ्यांनी संवाद साधला. या वेळी या शाळेतील आठवीच्या स्काऊट गाईडच्या हर्षल पाटील, अथर्व कुंभार, प्रतीक रानवरे, श्रेया पाटील, सिद्धी काबाडी यांनी परेड मानवंदना दिली. तर चौथीच्या विद्यार्थ्यांनी त्यांना ओवाळणी करून फुले उधळून ‘भारत माता की जय’, ‘वंदे मातरम’ अशा घोषणांनी त्यांचे स्वागत केले व देशभक्तीपर स्फूर्तिगीत गायले. त्यानंतर ‘सैनिक हो तुमच्यासाठी’ या कार्यक्रमातून ‘सैनिकांचे अंतरंग : एक मुलाखत’ या कार्यक्रमातून चौथीतील काव्या झगडे हिने त्यांच्याशी संवाद साधत रोखठोक व दिलखुलास प्रश्न विचारून त्यांची मुलाखत घेतली. या वेळी त्यांनी मनोगत व्यक्त करून मुलांनी नियमित व्यायाम करून आपले शरीर कमवावे, देशसेवेची आवड निर्माण करावी, विविध मोहिमांची माहिती घ्यावी, असे विद्यार्थ्यांना आवाहन केले. या वेळी शाळेच्या मुख्याधापिका चित्रा परब यांच्या हस्ते मेजर दत्ताजी पवार आणि त्यांची पत्नी कोमल यांचा सत्कार करण्यात आला. या वेळी मुख्याध्यापिका परब, शिक्षक घरत, अडसूळ बाई या शिक्षकांनीही आपले मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन चौथीतील वैष्णवी सूर्यवंशी हिने केले, तर आभार घरत सर यांनी मानले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शिक्षिका प्रमिला पाटील, सीमा जाधव, विद्यार्थी आणि पालकांनी विशेष मेहनत घेतली.