ITR Refund : आयटीआर भरला पण रिफंड मिळाला नाही? 'या' 6 कारणांमुळे अडकले असतील पैसे
Tv9 Marathi September 14, 2025 02:45 PM

आर्थिक वर्ष 2024-2025 साठी आयकर रिटर्न भरण्याची शेवटची तारीख 15 सप्टेंबर आहे. मात्र बऱ्याच लोकांनी आतापर्यंत रिटर्न भरले आहेत मात्र त्यांना अद्याप पैसे मिळालेले नाहीत. काही लोकांनी याबाबत सोशल मीडियावर तक्रारीही केल्या आहेत. पैसे न मिळण्यामागे काही कारणे असू शकतात. ही कारणे कोणती आहेत आणि त्यावर उपाय काय आहेत याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

बँक खाते प्री व्हॅलिडेट नसणे

आयकर रिटर्न भरल्यानंतर परतावा मिळवण्यासाठी आयकर विभागाच्या नियमांनुसार बँक खाते प्री व्हॅलिडेट असणे गरजेचे आहे. जर पॅन आणि बँक खात्यातील नाव जुळत नसेल किंवा IFSC कोड चुकीचा असेल, तर पैसे मिळत नाही. या कारणामुळे तुमचे पैसे अडकलेले असू शकतात.

आयटीआरचे ई व्हेरिफिकेशन नसणे

इनकम टॅक्स रिटर्न भरल्यानंतर 30 दिवसांच्या आत आयटीआरचे ई व्हेरिफिकेशन करणे आवश्यक आहे. मात्र तुम्ही आयटीआरचे ई व्हेरिफिकेशन केलेले नसेल, तर तुमचा रिटर्न अवैध मानला जाईल, परिणामी तुम्हाला कोणताही परतावा मिळणार नाही.

पॅनकार्ड आणि आधारकार्ड लिंक नसणे

पॅनकार्ड आणि आधारकार्ड एकमेकांशी लिंक नसेल तर रिटर्न प्रक्रिया थांबते, ज्यामुळे तुम्हाला परातावा मिळत नाही. त्यामुळे सर्वात आधी ही दोन्ही कागदपत्रे एकमेकांशी लिंक करा.

टीडीएस

बऱ्याच लोकांनी फॉर्म 26 एएस किंवा एआयएसमध्ये दाखवलेला टीडीएस आणि डिडक्टरने भरलेल्या माहितीमध्ये फरक असतो. त्यामुळेही परतावा थांबवला जातो.

जास्त परतावा असेल तर अडचणी येतात

बऱ्याचदा परताव्याची रक्कम 50 हजार रुपयांपेक्षा जास्त असेल तर आयकर विभाग अधिक छाननी करतो. मोठ्या रकमेमुळे क्रॉस-व्हेरिफिकेशन केले जाते, त्यामुळे पैसे मिळण्यास उशिर होऊ शकतो.

बँक डिटेल्समध्ये चूक

आयकर भरताना चुकीचा खाते क्रमांक देणे किंवा जुने खाते किंवा बंद पडलेल्या खात्याची माहिती दिल्यास आयकर विभागाकडून परतावा रोखला जातो.

पैसे अडकले असल्यास काय करावे?

आयकर भपल्यानंतर सतत incometax.gov.in पोर्टलवर आयटीआरची स्थिती तपासा. यावेळी काही चूक आढळली तर ती त्वरित दुरुस्त करा. माहिती बरोबर असेल तर ई-व्हेरिफिकेशन करा. यानंतर 2 ते 5 आठवड्यांच्या आत पैसे तुमच्या खात्यात जमा होतील.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.