पिंपरी : महापालिकेच्या वतीने आकुर्डी प्लॉट क्रमांक १८ येथे गेल्या १५ दिवसांपासून पदपथाचे काम सुरू आहे. त्यामुळे वाहतुकीच्या अडचणी वाढल्या आहेत. रस्ते अरुंद झाल्याने वाहनांना अडचणीतून मार्ग काढत जावे लागत आहे. तसेच काम करताना बॅरिकेड्स, वाहने रस्त्यावर असल्याने वाहतुकीचा खोळंबा होत आहे. हे रस्ते प्रशस्त राहावेत, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
या भागात पुणे नवनगर विकास प्राधिकरणाचे (पीएमआरडीए) कार्यालय असल्याने परिसरात नेहमीच मोठी वर्दळ असते. प्रशस्त रस्त्यांमुळे येथील वाहतूक तुलनेने सुरळीत होती. मात्र, पदपथ उभारणीमुळे रस्ते संकुचित झाले आहेत. परिणामी, वाहनचालकांना दैनंदिन अडचणींचा सामना करावा लागत आहे.
Pune News : वाघोलीतील शेतकऱ्यांची टीपी स्कीम रद्द करण्याची मागणीरस्ते अरुंद झाल्याने वाहतूक कोंडीचे प्रमाण वाढले असून, परिसरात गोंधळाचे वातावरण निर्माण झाले आहे. नागरिकांचे म्हणणे आहे की, पदपथा बांधण्यापेक्षा रस्ते प्रशस्त ठेवले गेले तर प्रवास अधिक सुलभ होईल. पादचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी पदपथा गरजेचे असले तरी या भागात आधीच रस्त्याची रुंदी कमी असल्याने निर्णयाचा पुनवर्चार होण्याची मागणी केली जात आहे.
या भागात रस्ते प्रशस्त आहेत. मात्र, आता पदपथाची कामे सुरू असल्याने रस्ते अरुंद होत आहेत. वाहनचालकांना मार्ग काढताना कसरत करावी लागत आहे. त्यामुळे याचा विचार करावा.
- सूरज गायकवाड, नागरिक