अमृता पुणतांबेकर-खोले हिने 'हाय ऑन सॅलड्स' ब्रॅंडद्वारे विविध प्रकारच्या सॅलड्सचा व्यवसाय सुरू केला आहे. कोविड काळात सुरू झालेल्या या उपक्रमामुळे वजन कमी करण्यासाठी सॅलड्सचा आहारात समावेश करून अनेकांना फिटनेस साधता आला आहे. तिच्या सॅलड्समध्ये विविध भाज्या, फळे आणि खास ड्रेसिंग्जचा समावेश आहे, ज्यामुळे चवदार आणि आरोग्यदायी आहार मिळतो.
वजन कमी करायचे आहे, मग आहारात फायबर जास्त घ्या, सॅलड खा, असा सल्ला डॉक्टर, आहारतज्ज्ञ देतात. मात्र, रोज वेळ काढून चविष्ट सॅलड बनवणे अनेकांना विशेषतः महिलांना शक्य होत नाही. अशावेळी वाटते कोणी रोज आयते सॅलड करून दिले तर...हीच गरज ओळखून अमृता पुणतांबेकर-खोले हिने नानाविध पद्धतीची सॅलड्स तयार करून देण्याचा व्यवसाय सुरू केला आणि सॅलड्सचा आहारात समावेश करून फिट अँड फाइन होण्याचे स्वप्न पूर्ण केले. आज तिचा ‘हाय ऑन सॅलड्स’ ब्रॅंड घराघरात पोहोचला असून, वेगवेगळ्या भाज्या, फळे, कडधान्ये आणि वैशिष्ट्यपूर्ण सॅलड ड्रेसिंगचा वापर करून तयार केलेली चवदार सॅलड्स दररोज अनेकांच्या निरामय आरोग्यासाठी हातभार लावत आहेत.
अमृताचा हा व्यवसाय सुरू झाला तो कोविड साथीच्या काळात. हॉटेल मॅनेजमेंटमध्ये बीएस्ससी केल्यानंतर शेफ म्हणून तिने नोकरी सुरू केली. मात्र, कोविड काळात घरी दीर्घकाळ असल्याने स्वतःचा व्यवसाय सुरू करावा असा विचार आला. तिची फिटनेस प्रशिक्षक आसावरी पाटणकर यांच्या प्रोत्साहनामुळे अनुभव, आवड आणि काहीतरी आरोग्यदायी देण्याचा विचार यातून सॅलड देण्याचा व्यवसाय करण्याचा निर्णय तिने घेतला. अमृताचा जोडीदार ओंकारही याच क्षेत्रातील असल्याने व्यवसायासाठी पाठिंबा आणि मदतीची हमीही मिळाली.
स्वतःच्या बचतीतून गुंतवणूक करून छोट्या प्रमाणात सॅलड तयार करून देण्यास तिने सुरुवात केली. सॅलडमध्ये सर्वांत महत्त्वाची गोष्ट असते, ती म्हणजे भाज्या, फळे कापणे आणि वेगवेगळ्या प्रकारची ड्रेसिंग्ज म्हणजे सॅलडची चव वाढवणारे सॉससारखे पदार्थ तयार करणे. डाएट करताना अनेकांना गोड खाण्याचे किंवा भेळ, पाणीपुरी, चाट, चायनीज, इटालियन, मेक्सिकन पदार्थ खाण्याचे क्रेव्हिंग होते म्हणजे ते पदार्थ खाल्ल्याशिवाय चैन पडत नाही. अमृताने अशा चवींचा अनुभव देणारी ड्रेसिंग्ज तयार केली आहेत. त्यामुळे तिची सॅलड्स अशी क्रेव्हिंग्ज टाळण्यासाठी उपयुक्त ठरतात आणि लोकांना डाएट न मोडल्याचे आणि हव्या असलेल्या चवीचा अनुभव घेतल्याचा आनंदही मिळतो.
अमृताने तिची सॅलड्स ‘वन मील रिप्लेसमेंट’ अशी तयार केली आहेत, त्यामुळे वजन कमी करण्यासाठी धडपडणाऱ्या लोकांना मोठी मदत झाली आहे. तिच्या वैविध्यपूर्ण चवींच्या सॅलड्समुळे अगदी अल्पावधीतच मागणी वाढू लागली. उपवासाचे सॅलड
अनेकांना उपवास असेल, तर उपवासाचे पदार्थ खाऊन ॲसिडिटीचा त्रास होतो किंवा डाएट मोडण्याची काळजी असते. यावर अमृताने चक्क उपवासासाठी चालणारी आगळीवेगळी सॅलड्स आणून अनेकांचा प्रश्न सोडवला आहे. ही सॅलड्स लोकांना इतकी आवडली, की अनेकांनी सोडलेले उपवास परत सुरू केले. आता अनेकजण फक्त उपवासाला तिच्याकडून सॅलड मागवतात.
अमृताकडे शाकाहारी आणि मांसाहारी पद्धतीची सॅलड उपलब्ध आहेत. तसेच पूर्ण महिन्याभरासाठी सबस्क्रिप्शनची सुविधाही आहे. ती आठवड्याचा मेन्यू पाठवते आणि त्यानुसार ग्राहक आवडीप्रमाणे सॅलडची ऑर्डर देतात. दररोज सकाळी आठ ते साडेदहा यावेळेत कोथरूड, पुनावळे, तळेगाव, बाणेर, औंध, पिंपरी-चिंचवडपर्यंत सॅलड घरपोच केली जातात. चार ते पाच मुले ऑर्डर घरपोच देण्यासाठी आणि तीन ते चार महिला भाज्या चिरणे, पॅकिंग आदी काम करतात. अमृता केटरिंगचाही व्यवसाय करते. पावभाजीपासून पुरणपोळीच्या सांग्रसंगीत जेवणाच्या पाचपासून पन्नास माणसांसाठीच्या ऑर्डर ती घेते. हा सर्व व्याप सांभाळण्यासाठी तिला आई-वडील, भाऊ, सासू-सासरे, मुलगा आणि अर्थात नवरा यांची मोठी मदत होते. तिची सॅलड्स मुंबईपर्यंत पोहोचविण्याचा तिचा मानस आहे.
वजन कमी करण्यासाठी सॅलड का खावे?
सॅलडमध्ये फायबर आणि कमी कॅलरी असतात, जे भूक नियंत्रित करतात आणि पचन सुधारतात, ज्यामुळे वजन कमी होण्यास मदत होते.
सॅलडमध्ये कोणते पदार्थ समाविष्ट करावे?
हिरव्या पालेभाज्या, टोमॅटो, काकडी, गाजर, बीन्स, आणि प्रथिनांसाठी चिकन किंवा नट्स यांचा समावेश करा.
सॅलड कधी खावे?
होय, साखरयुक्त किंवा जास्त तेल असलेले ड्रेसिंग टाळा; ऑलिव्ह ऑईल, लिंबाचा रस किंवा दही-आधारित ड्रेसिंग वापरा.
सॅलड ड्रेसिंगचे वजन कमी करण्यावर परिणाम होतात का?
होय, साखरयुक्त किंवा जास्त तेल असलेले ड्रेसिंग टाळा; ऑलिव्ह ऑईल, लिंबाचा रस किंवा दही-आधारित ड्रेसिंग वापरा.