माहिती अधिकार पारदर्शकतेला
पोलिस उपअधीक्षकांकडून तडा
जयंत बरेगार ः गुन्हा दाखल करा
सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. १३ ः माहिती अधिकाराच्या कायदेशीर पारदर्शकतेला तडा दिल्याप्रकरणी सिंधुदुर्गचे पोलिस उपअधीक्षक यांच्यावर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी माहिती अधिकार कार्यकर्ते जयंत बरेगार यांनी सिंधुदुर्गनगरी पोलिस ठाण्याकडे केली आहे.
यात त्यांनी म्हटले आहे की, आपण १४ जुलैला पोलिस महासंचालक, महाराष्ट्र यांच्याकडे सिंधुदुर्ग जिल्हा पोलिस अधीक्षक कार्यालयातील काही ठिकाणी अनधिकृतपणे वातानुकूलित यंत्रे बसवल्याबद्दल तक्रार केली होती. याची अधिक माहिती मिळवण्यासाठी ९ ऑगस्टला माहिती अधिकारात अर्ज केला होता. या अर्जाला उत्तर देताना प्रभारी जन माहिती अधिकारी तथा पोलिस उपाधीक्षक यांनी ई-मेलद्वारे, ‘माहितीच्या अधिकार अधिनियमात अशी कोणतीही तरतूद नाही,’ असे उत्तर दिले. हे उत्तर खोटे आणि दिशाभूल करणारे आहे. माहिती अधिकार अधिनियमामध्ये, ‘कोणत्याही सार्वजनिक प्राधिकरणाच्या कार्यालयाची पाहणी करून देणे’ अशी स्पष्ट तरतूद आहे. त्यामुळे अर्जदाराला कार्यालयाची पाहणी करण्याची परवानगी देणे, हे जन माहिती अधिकाऱ्याचे कर्तव्य होते. मात्र, संबंधितांनी ते पार पाडले नाही. यातून कायद्याची पारदर्शकता धोक्यात आणली आहे, असा आरोप बरेगार यांनी केला आहे.