आशिया कप स्पर्धेतील आज (14 सप्टेंबर 2025) होणाऱ्या सामन्यात भारताचा मुकाबला पाकिस्तानशी होणार आहे.
क्रिकेटप्रेमींसाठी भारत-पाकिस्तान सामना नेहमीच विशेष मानला जातो. पण पहलगाम हल्ल्यानंतर मे महिन्यात दोन्ही देशांतील तणाव प्रचंड वाढला होता.
पहलगाम हल्ल्यानंतर पहिल्यांदाच भारत आणि पाकिस्तानच्या क्रिकेट संघांचा सामना होणार आहे.
काँग्रेस, आम आदमी पार्टी आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) या पक्षांसह अनेक विरोधी पक्षांनी पाकिस्तानविरुद्ध क्रिकेट खेळण्यास विरोध केलाय. सोशल मीडियावरूनही या सामन्यावर बहिष्काराची मागणी केली जातेय.
भाजप नेते अनुराग ठाकूर यांनी मात्र भारतीय क्रिकेट कंट्रोल बोर्डाच्या (बीसीसीआय) निर्णयाचं समर्थन केलंय.
त्यांचं म्हणणं आहे की, स्पर्धेच्या दृष्टीने भारताने पाकिस्तानविरुद्ध खेळणे आवश्यक आहे.
विरोधकांचा सरकारवर निशाणाआम आदमी पार्टीने दिल्लीमध्ये या सामन्याविरोधात आंदोलन केलं. 'आप'चे दिल्लीचे प्रदेशाध्यक्ष सौरभ भारद्वाज यांनी एक्सवर (पूर्वीचं ट्विटर) व्हीडिओ शेअर करूनलिहिलंय की, "अशी काय हतबलता आहे की, आपल्या बहिणींचं सिंदूर पुसणाऱ्यांसोबत क्रिकेट खेळायचंय? आम्ही याचा तीव्र विरोध करतो आणि बहिष्कार टाकतो."
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी केंद्र सरकारवर हल्ला करत म्हटलंय की, "तीन ते चारच महिन्यांपूर्वी पहलगाममध्ये आपले नागरिक मारले गेले, आपल्या बहिणींचं सिंदूर पुसलं गेलं, ते दु:ख अजूनही भरून निघालं नाही."
उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या एका जुन्या विधानाची आठवण करून दिली.
उद्धव ठाकरे म्हणाले, "पंतप्रधानांनी स्वतः म्हटलं होतं की, रक्त आणि पाणी एकत्र वाहू शकत नाही. जर रक्त आणि पाणी एकत्र वाहू शकत नाहीत, तर क्रिकेट आणि रक्त एकत्र कसे जाऊ शकते? खेळ आणि युद्ध एकत्र कसे खेळले जाऊ शकते?"
उद्धव ठाकरेंनी आरोप केला की, सरकारने मध्येच ऑपरेशन थांबवलं आणि देशभक्तीला फक्त व्यापार बनवलं.
दरम्यान, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या राज्यसभा खासदार प्रियांका चतुर्वेदी यांनी भारतीयांना आवाहन करत म्हटलंय की, "जर बीसीसीआय आणि भारत सरकार भारत-पाकिस्तान सामना रद्द करू शकत नाहीत, तर आता वेळ आली आहे की आपण नागरिकांनीच हा सामना पाहण्यावर बहिष्कार टाकावा.
दहशतवादी कृत्यांच्या पार्श्वभूमीवर क्रिकेट खेळला जाऊ शकत नाही, अशा क्रिकेट सामन्याला नाकारून शहिदांच्या कुटुंबीयांच्या पाठीशी उभे राहा."
काँग्रेस नेते प्रियांक खर्गे यांनीही एक्सवरून प्रश्न विचारलाय की, "पहलगाम दहशतवादी हल्ल्यात गेलेल्या जीवांची किंमत भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्यातून होणाऱ्या जाहिरातींच्या उत्पन्नापेक्षा कमी आहे का? ही खेळ भावना नाही, तर आपल्या शहिदांच्या रक्तावर नफा मिळवण्याचं लाजीरवाणं उदाहरण आहे."
अनुराग ठाकूर यांनी केलं BCCI चं समर्थनभाजप खासदार आणि माजी BCCI चे माजी अध्यक्ष अनुराग ठाकूर यांनी भारत-पाकिस्तान सामना खेळण्याच्या निर्णयाचे समर्थन केलंय.
माध्यमांशी बोलताना अनुराग ठाकूर म्हणाले की, "मल्टिनॅशनल टूर्नामेंट एसीसी किंवा आयसीसी आयोजित करतात. तिथे कोणत्याही देशासाठी सहभाग घेणे गरजेचे असते. जर सहभाग घेतला नाही, तर टूर्नामेंटमधून बाहेर व्हावे लागेल. दुसऱ्या संघाला त्याचे पॉइंट्स मिळतील."
भारत पाकिस्तानसोबत द्विपक्षीय मालिका खेळत नाही, असं ठाकूर म्हणाले.
तसंच, "अनेक वर्षांपासूनचा आमचा निर्णय आहे की, जोपर्यंत पाकिस्तान भारतावर दहशतवादी हल्ले थांबवत नाही, तोपर्यंत भारत पाकिस्तानसोबत बायलेटरल मालिका खेळणार नाही," असंही ठाकूर यांनी सांगितलं.
पहलगाम हल्ल्यातील मृत शुभम द्विवेदीच्या पत्नी काय म्हणाल्या?पहलगाम हल्ल्यात मृत्यू झालेल्या शुभम द्विवेदी यांच्या पत्नी ऐशन्या द्विवेदी यांनी याबाबत नाराजी व्यक्त केली.
हल्ल्यानंतर सरकारनं कठोर पावलं उचलली, पण पाकिस्तानबरोबर सामना झाल्याने चुकीचा संदेश जातो, असं त्या वृत्तसंस्थेशी बोलताना म्हणाल्या.
"बीसीसीआयला पाकिस्तानशी सामना खेळण्यास होकार द्यायला नको होता. ही मोठी चूक असून आपल्याच देशातले लोक ती करत आहे. बीसीसीआयला या भावनांशी काही घेणं नाही."
हा सामना खेळून पाकिस्तानला आपण आणखी बळ देत असल्याचंही त्यांनी म्हटलं.
"सामन्यातून मिळणारं उत्पन्न पाकिस्तान दहशतवादासाठी वापरेल. पाकिस्तान दहशतवादाचं केंद्र आहे हे माहिती असतानाही, आपण त्यांना उत्पन्न का मिळवून द्यावं?"
या विषयी कोणत्याही भारतीय क्रिकेटपटूनं उघडपणे भूमिका घेतली नसल्याचा मुद्दाही त्यांनी उपस्थित केला.
ऐशन्या म्हाल्या की, कोणत्याही खेळात 'राष्ट्र भावना' सर्वोच्च असते. पण तरीही एकही क्रिकेटपटू भारत-पाकिस्तान सामन्यावर बहिष्कार टाकावा, असं म्हणत नाही.
क्रिकेटपटूंना आवाहन करत त्या म्हणाल्या की, "तुम्ही (भारतीय क्रिकेटपटू) भूमिका का घेत नाही? बीसीसीआय तुमच्यावर बंदूक रोखतं का? तुम्ही देशासाठी भूमिका घेतली पाहिजे, पण तीही घेत नाहीत."
तिकीट विक्री मंदावली का?आशिया कप 2025 च्या ग्रुप अ मधील सामन्यात भारत आणि पाकिस्तान संघ 14 सप्टेंबर आमने-सामने असतील.
या ग्रुपमध्ये संयुक्त अरब अमिराती (UAE) आणि ओमानचाही समावेश आहे. भारत-पाकिस्तान पुढील टप्प्यासाठी पात्र ठरले तर 21 सप्टेंबर रोजी पुन्हा दोन्ही देशांत सामना होईल.
दरम्यान, या सामन्यापूर्वी तिकिटांच्या विक्रीबाबत वेगवेगळे दावे करण्यात आले आहेत.
बीबीसी उर्दूनं ऑनलाइन तिकीट वेबसाइटवरून घेतलेल्या माहितीनुसार, 29 ऑगस्टपासून बुकिंग सुरू झालं असलं तरी शुक्रवारी दुपारपर्यंत तिकिटं शिल्लक होती.
यापूर्वी दुबईत 23 फेब्रुवारीला झालेल्या चॅम्पियन्स ट्रॉफीतील भारत-पाकिस्तान सामन्याची तिकिटं मात्र काही मिनिटांत संपली होती.
एमिरेट्स क्रिकेट बोर्डाच्या एका अधिकाऱ्यानं नाव न छापण्याच्या अटीवर बीबीसी उर्दूला सांगितलं की, तिकीट विक्री मंदावल्याचा समज चुकीचा आहे. कारण, सामन्याला अजूनही दोन दिवस शिल्लक आहेत.
70 ते 80 टक्के तिकिटं विकली असून रविवारपर्यंत सर्व तिकिटं विकली जातील, असा दावाही या अधिकाऱ्यानं केला.
दुसरीकडं, तज्ज्ञांच्या मते, संयुक्त अरब अमिरातीमध्ये भारतीय समुदाय मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळं भारत-पाकिस्तान सामना पाहण्यासाठी शक्यतो लोक मोठ्या संख्येनं मैदानात येतात.
पण यावेळी पाकिस्तान विरोधातील सामन्यावर बहिष्कार टाकण्यासाठीच्या मोहिमेचा परिणामही झाला आहे. पाकिस्तानी प्रेक्षकांना व्हिसा मिळण्याच्या शंकांमुळंही तिकीट विक्री मंदावली आहे.
पाकिस्तान क्रिकेट संघाचे माजी कर्णधार रशीद लतीफ म्हणाले की, "भारत-पाकिस्तान सामन्यापूर्वी दिसणारा उत्साह नसल्याचं यावेळी प्रथमच जाणवत आहे."
भारतीय ऑफस्पिनर रविचंद्रन अश्विननं याचा संबंध प्रतिस्पर्धी संघांशी जोडला.
"भारतीय संघ इतर संघांपेक्षा खूपच मजबूत आहे. त्यांनी 'अ' संघ पाठवला तरी इतर संघांशी दोन हात करू शकतो," असं अश्विन म्हणाला.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)