ओबीसी कोट्यातून मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी गणेशोत्सवादरम्यान आंदोलन करून सरकारला वेठीस धरलं होतं. त्यानंतर सरकारने हैदराबाद गॅझेटच्या अंमलबजावणीला मान्यता दिली. असं असतानाच मराठा आरक्षणाच्या जीआरविरोधात ओबीसी समाज चांगलाच आक्रमक झाला आहे. या जीआरने मराठा समाजाचा लाभ होईल असं वाटतं का, असा प्रश्न शरद पवार यांनी विचारण्यात आला. त्यावर ‘अ ब क असा विचार न करता सर्वांनी एकत्र येऊन विचार केला पाहिजे’, असं ते म्हणाले.
जीआरसंदर्भात काय म्हणाले?“सरकारने असं करणं योग्य नाही. एक समिती एका मंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली, तर दुसरी दुसऱ्याच्या अध्यक्षतेखाली आहे. सरकार कुठल्याही जातीधर्माचं नाही, सरकार सर्वांचं असावं, सरकार व्यापक असावं. कोणतीही कमिटी एका जातीची करू नका, समाजाची करा. माझा सांगण्याचा उद्देश हाच आहे की सामाजिक ऐक्य हवं, त्यात अंतर नको”, असं वक्तव्य शरद पवारांनी केलं.
मराठा नेत्यांबद्दलच्या भुजबळांच्या वक्तव्यावर प्रतिक्रियाओबीसी नेते छगन भुजबळ यांनी काही लोकांच्या दादागिरीमुळे मराठा नेते बोलायला तयार नाहीत असं वक्तव्य केलं होतं. त्यावरही शरद पवारांनी प्रतिक्रिया दिली आहे. “एका जातीचं राजकारण आम्हाला शोभत नाही. आम्हाला व्यापक दृष्टीकोन पाहिजे. अंतर वाढेल असं भाष्य करणं योग्य नाही. सामाजिक ऐक्य हवं,” असं ते पुढे म्हणाले.
मोदींचा मणिपूर दौरा अन् भारत विरुद्ध पाकिस्तान सामनायावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मणिपूर दौऱ्याविषयीही भाष्य केलं. “मोदींनी मणिपूरला जावं अशी मागणी होत होती. त्यामुळे ते तिकडे गेले ते चांगलं झालं”, अशी प्रतिक्रिया पवारांनी दिली. तर भारत विरुद्ध पाकिस्तानच्या सामन्याबद्दल प्रश्न विचारला असता “आता काय त्यावर चर्चा करता? एक दिवसाचा प्रश्न आहे”, असं ते म्हणाले. आज दुबईत भारत विरुद्ध पाकिस्तानचा सामना खेळला जाणार आहे. या सामन्याला ठाकरेंच्या शिवसेनेकडून तीव्र विरोध केला जात आहे.
जरांगेंना पाठिंबा?मनोज जरांगेंना शरद पवारांचा पाठिंबा असल्याचा आरोप होत आहे. त्यावरही त्यांनी स्पष्ट उत्तर दिलं. “ज्याच्याशी आमचा कवडीचाही संबंध नाही, त्यावर काही भाष्य करण्याची गरज नाही. ते सत्यावर आधारित नाही. त्यामुळे त्यावर भाष्य नको”, असं ते म्हणाले.