Dhule News : आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांचे बोगस डॉक्टरांवर कारवाईचे आदेश
esakal September 15, 2025 02:45 AM

धुळे: जिल्हावासीयांना सार्वजनिक आरोग्य विभागाच्या माध्यमातून दर्जेदार आरोग्य सेवा देण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील, असे प्रतिपादन सार्वजनिक आरोग्य व कुटुंबकल्याणमंत्री प्रकाश आबिटकर यांनी येथे केले. त्यांच्या हस्ते साक्री रोडवरील जिल्हा शासकीय रुग्णालयात शनिवारी (ता. १३) दुपारनंतर कार्डियाक कॅथ लॅबचे लोकार्पण झाले.

आमदार काशीराम पावरा, आमदार मंजूळा गावित, आमदार राम भदाणे, हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. सयाजी भामरे, अपर जिल्हाधिकारी सुभाष बोरकर, आरोग्य विभागाच्या सहसंचालक डॉ. सुनीता गोलाईत, उपसंचालक डॉ. कपिल आहेर, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. दत्ता देगावकर, माजी आमदार प्रा. शरद पाटील, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख डॉ. तुळशीराम गावित, मनोज मोरे, हिलाल माळी, सतीश महाले, महानगरप्रमुख संजय वाल्हे, विशाल देसले आदी उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते आरोग्य विषयक पुस्तिकेचे प्रकाशन झाले. तसेच आरोग्यमंत्री आबिटकर यांच्या हस्ते डॉ. नीलेश चांडक, डॉ. अश्विनी भामरे, डॉ. रवींद्र सोनवणे, डॉ. सुवर्णा सूर्यवंशी आदींचा उत्कृष्ट कार्याबद्दल सन्मान झाला.

रुग्णांना लाभ द्यावा

मंत्री आबिटकर म्हणाले, की जिल्हा रुग्णालयात कार्यान्वित कॅथ लॅबच्या माध्यमातून नागरिकांना दर्जेदार आरोग्य सेवा मिळेल. दर्जेदार आरोग्य सुविधा पुरवित जास्तीत जास्त रुग्ण शासकीय आरोग्य केंद्रात येतील यासाठी आरोग्य अधिकारी व कर्मचाऱ्यांनी प्रयत्न करावे. आरोग्य विभागाविषयी सूचना, मागण्यांबाबत सकारात्मक दृष्टिकोन ठेवला जाईल. तसेच राज्यात २६ डे केअर सेंटर सुरू करणार असल्याचेही मंत्री आबिटकर यांनी सांगितले. डॉ. देगावकर यांनी प्रास्ताविक केले. वाहिद अली सय्यद यांनी सूत्रसंचालन केलेले. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सचिन बोडके, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. महेश भडांगे, डॉ. स्वप्नील पाटील, डॉ. नितीन पाटील यांच्यासह आरोग्य विभागाचे अधिकारी व कर्मचारी, नागरिक उपस्थित होते.

बनावट डॉक्टरांचा प्रश्न

जिल्हाधिकारी कार्यालयात मंत्री आबिटकर यांच्या अध्यक्षतेत आरोग्य विभागाची आढावा बैठक झाली. आमदार गावित, सहसंचालक गोलाईत, अपर जिल्हाधिकारी बोरकर, अपर पोलिस अधीक्षक डॉ. अजय देवरे, उपसंचालक डॉ. आहेर, जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी इंगळे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बोडके आदी उपस्थित होते. मंत्री आबिटकर यांनी सांगितले, की जिल्ह्यात बोगस वैद्यकीय व्यवसाय करणाऱ्यांविरोधात मोहीम राबवावी. त्यासाठी पोलिस दलाची मदत घ्यावी. पीसीपीएनडीटी कायद्याची प्रभावीपणे अंमलबजावणी करावी. त्यासाठी कृती दल स्थापन करावे.

Successful Delivery: 'साताऱ्यातील शासकीय रग्णालयात एका वेळी चार बाळांना जन्म'; आईसह तीन मुली, मुलगा सुखरूप, प्रसूतीची तिसरी वेळ

उपस्थितीकडे लक्ष द्यावे

प्रत्येक आरोग्य केंद्रात आरोग्य कर्मचारी, वैद्यकीय अधिकारी उपस्थित राहतील याची दक्षता घ्यावी. राज्य कामगार विमा मंडळाच्या माध्यमातून विविध योजना राबविण्यात येतात. त्यांचीही कामगारांमध्ये जनजागृती करावी. त्यासाठी उद्योजकांबरोबर बैठक घ्यावी. आरोग्य केंद्रात स्वच्छता राहील, अशी काळजी घ्यावी. तसेच कर्करोग, क्षयरोगविषयी जनजागृती करावी, असेही मंत्री आबिटकर यांनी बैठकीत सांगितले. डॉ. योगेश ठाकरे, हिलाल माळी, सतीश महाले, मनोज मोरे, संजय वाल्हे यांनी विविध सूचना केल्या.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.