अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर 50 टक्के कर लादला आहे. त्यामुळे दोन्ही देशांमधील तणाव वाढला आहे. या कराचा थेट परिणाम व्यापारावर झाला आहे. अशातच आता अमेरिकेचे वाणिज्य मंत्री हॉवर्ड लुटनिक यांनी भारताच्या व्यापार धोरणांवर टीका केली आहे. भारताला जागतिक व्यापारातून फायदा होतो, यामुळे भारताचा बाजारपेठेतील प्रवेश मर्यादित होतो व ते आमची उत्पादने खरेदी करत नसल्याचे लुटनिक यांनी म्हटले आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.
भारत आमच्याकडून एक पोतंही मका खरेदी करत नाहीअमेरिकेचे वाणिज्य मंत्री हॉवर्ड लुटनिक यांनी ‘अॅक्सिओस’ला एक मुलाखत दिली. यामध्ये लुटनिक म्हणाले की, भारताला 1.4 अब्ज लोकसंख्या असल्याचा अभिमान आहे. मात्र भारत अमेरिकेच्या कृषी उत्पादनांमध्ये फारसा रस दाखवत नाही. कारण भारत आमच्याकडून एक बुशेल (25.40 किलो) मका ही खरेदी करत नाही. भारत आमची मका खरेदी करणार नाही कारण तो प्रत्येक गोष्टीवर कर लादतो. तुम्हाला हा कर स्वीकारावा लागेल नाहीतर त्यांच्यासोबत व्यापार करणे कठीण होते.
हॉवर्ड लुटनिक यांनी पुढे बोलताना म्हटले की, भारताचा जगावरील प्रभाव वाढत आहे. भारताची बाजारपेठ मुक्त आहे, मात्र भारताची संरक्षणवादी भूमिका अमेरिकन व्यापाऱ्यांना निराश करत आहे. अमेरिका भारतीय वस्तू उघडपणे खरेदी करते, परंतु जेव्हा आम्हाला विक्री करायची असते तेव्हा भारत त्या खरेदी करत नाही.
‘तेल खरेदीमुळे व्यापार असंतुलन’लुटनिक यांनी भारत रशियाकडून खरेदी करत असलेल्या कच्च्या तेलाबाबतही भाष्य केले आहे. ‘अमेरिका आणि इतर देशांनी रशियावर अनेक निर्बंध घातले आहेत. मात्र भारत आपल्या विकासाला चालना देण्यासाठी रशियाकडून तेल खरेदी करत आहे, यामुळे जागतिक व्यापारात असंतुलन निर्माण होत आहे. मात्र असं असलं तरी अमेरिका आणि भारत संरक्षण, तंत्रज्ञान आणि गुंतवणुकीच्या क्षेत्रात पार्टनर आहेत. आम्ही भारतासोबतचे संबंध कमी करणार नाही’ असंही लुटनिक यांनी म्हटलं आहे.
दरम्यान, भारत अजूनही रशियाकडून तेल खरेदी करण्यावर ठाम आहे. अमेरिकेने भारतावर दंड म्हणून 25 टक्के अतिरिक्त कर लावला आहे, मात्र तरीही भारताने माघार घेतलेली नाही. आम्ही देशातील नागरिकांच्या हिताचे रक्षण करण्यासाठी रशियन तेल खरेदी करत राहणार अशी भूमिका भारताने घेतली आहे.