खासगी कंपनीच्या पार्किंगमुळे रुग्णवाहिकेला अडथळा
माजी गटनेते मनोहर डुंबरे यांचे वाहतूक पोलिस निरीक्षक जितेंद्र राठोड यांना निवेदन
ठाणे, ता. १४ (बातमीदार) : पातलीपाडा येथील सेवा रस्त्यावर दुतर्फा होणाऱ्या खासगी कंपनीच्या पार्किंगमुळे रुग्णवाहिकेला दररोज अडथळ्यांचा सामना करावा लागत आहे. घोडबंदर रोडवरील या प्रकाराकडे भाजपाचे माजी गटनेते मनोहर डुंबरे यांनी लक्ष वेधून बेकायदा पार्किंगविरोधात कारवाई करण्याची मागणी वाहतूक पोलिसांकडे केली आहे.
पातलीपाडा येथील सेवा रस्त्यावरील होरायझन हॉस्पिटलजवळच्या दुतर्फा रस्त्यावर किराणा वस्तू डिलिव्हरी करणाऱ्या कंपनीच्या दुचाकी व खासगी वाहने बेकायदा पार्किंग केली जातात. तसेच ब्रह्मांड परिसरातील मुख्य रस्त्यांवरही एका प्रतिष्ठित आयटी कंपनीतील कर्मचाऱ्यांची वाहतूक करणाऱ्या बस रात्री व दिवसा उभ्या असतात. याकडे मनोहर डुंबरे यांनी पत्राद्वारे लक्ष वेधले. सेवा रस्त्यावर मोठ्या संख्येने डिलिव्हरी करणाऱ्या कंपनीच्या १०० ते १५० दुचाकी उभ्या केल्या जातात. त्यामुळे सातत्याने रुग्णवाहिकांना अडथळा येतो. तसेच नागरिकांना चालण्यासही जागा राहत नाही. त्याच प्रकारे ब्रह्मांड परिसरातील मुख्य रस्त्यांवर कंपनीच्या बसेस उभ्या केल्या जातात.
या बसमध्ये स्टोव्हवर स्वयंपाक केला जात असल्यामुळे आगीचा धोका आहे. एकीकडे हिरानंदानी इस्टेट परिसरात रस्त्यालगतच्या वाहनांवर सातत्याने कारवाई होत असताना, पातलीपाडा येथील खासगी कंपनीच्या दुचाकी व ब्रह्मांड परिसरातील बेकायदा बस पार्किंगकडे पोलिसांचे दुर्लक्ष होत आहे, असा आरोप करीत माजी गटनेते मनोहर डुंबरे यांनी कासारवडवली विभागाचे वाहतूक पोलिस निरीक्षक जितेंद्र राठोड यांना कारवाई करण्यासाठी निवेदन दिले.
चौकट
हिरानंदानी संकुलातील वाहनांवर संक्रांत
हिरानंदानी संकुलातील शॉपिंग सेंटर व अंतर्गत रस्त्यांवरील दुचाकींवर सातत्याने पोलिसांकडून कारवाई केली जाते. मात्र सेवा रस्त्यावरील खासगी कंपनीच्या दुचाकी, ब्रह्मांडमधील एका खासगी कंपनीच्या बसला अभय दिले जाते, याबद्दल नागरिकांमध्ये नाराजी आहे.