रेतीमुळे सहजानंद चौकात वाहतूक कोंडी
कल्याण, ता. १४ (बातमीदार) : पश्चिमेतील अत्यंत महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या सहजानंद चौकात रविवारी (ता. १४) मध्यरात्रीच्या सुमारास वाहतूक कोंडी निर्माण झाली होती. रस्त्याच्या मधोमध रेतीचा ढिगारा पडल्याने वाहतुकीस अडथळा निर्माण होत होता. त्यामुळे वाट काढून वाहने मार्गस्थ होत असताना मागे रांगा लागल्याने इतर लेनवरीलही वाहतूक प्रभावित झाली होती. वाहतूक पोलिसांनी घटनास्थळी पोहोचत हा रेतीचा ढिगारा हटवून वाहतूक पूर्वपदावर आणली असल्याची माहिती प्रवाशांकडून देण्यात आली.
सहजानंद चौकातून दररोज हजारो वाहने ये-जा करतात. या चौकात तब्बल सहा रस्ते एकत्र येत असल्याने मार्गिका बदलताना कोणते वाहन कुठे वळण घेत आहे, हे समजण्यातच दुसऱ्या वाहनचालकांचा गोंधळ उडतो. छत्रपती शिवाजी महाराज चौक, रामबाग, काळा तलाव, लाला चौकी आदी भागांतून येणारी वाहने या चौकातून मार्गस्थ होत असल्याने वाहतूक कोंडी अधिक प्रमाणात होत असते. अशातच, रस्त्यांच्या मधमोधच रेतीचा ढिगारा पडल्याने वाहने अडकून पडत होती. अखेर वाहतूक पोलिसांनी मातीचा ढिगारा हटवल्याने वाहतूक पूर्वपदावर आली.