नाशिक: बहीण आणि मेहुण्यात होणारे भांडण भाऊ या नात्याने सोडवत असल्याने त्याचा राग मेहुण्याच्या मनात होता. याच रागातून त्याने शालकाचे अपहरण केले आणि थेट परतूर (जि. जालना) गाठले. शालकाला कोंडून बेदम मारहाण करण्यात आली होती. अंबड पोलिसांनी परतूर गाठून युवकाची सुटका केली असून, संशयित मेहुण्याला अटक केली आहे. त्याचा संशयित मित्र फरारी झाला. या प्रकरणी अंबड पोलिसांत अपहरणासह विविध कलमांन्वये गुन्हा दाखल केला आहे.
शीतल अनिल अंबुरे (वय २५, रा. घरकुल योजना, चुंचाळे शिवार, अंबड) यांच्या फिर्यादीनुसार, त्या पती अनिल अंबुरे आणि कुटुंबीयांसह राहतात. तर, त्याच परिसरात अनिल अंबुरे यांची बहीण ज्योती संदीप चव्हाण व त्यांचा पती संदीप चव्हाण हे राहतात. चव्हाण दांपत्यात सतत भांडण होतात; तर अनिल अंबुरे हे त्यांचे वाद मध्यस्थी करीत मिटवितात.
दोघांची समजूत घालतात. याचा राग संशयित संदीप चव्हाण याच्या मनात होता. त्यातून त्याने शालक अनिल अंबुरे यांचाच काटा काढण्याचा कट रचला. गुरुवारी (ता. ११) शीतल अंबुरे या कंपनीत कामाला गेल्या आणि सायंकाळी घरी आल्या असता त्यांचे पती अनिल अंबुरे घरी नव्हते. रात्री उशीर होऊनही घरी न आल्याने त्यांचा शोध घेतला; परंतु ते मिळून आले नाहीत.
रात्री साडेआठच्या सुमारास संशयित संदीप चव्हाण याने शीतल अंबुरे यांच्या मोबाईलवर संपर्क साधत, ‘मी अनिलला उचलून आणले आणि मी त्याला रात्रीतून मारून टाकीन, अशी धमकी देत शिवीगाळ केली. त्याचवेळी तिचे पती अनिल यांचा ओरडण्याचा आवाज आला. ते म्हणत होते, ‘शीतल मला वाचव, हे दोघे मला मारून टाकतील...’ यामुळे शीतल अंबुरे या घाबरल्या आणि त्यांनी अंबड पोलिस ठाणे गाठत घटनेची माहिती दिली. या प्रकरणी अंबड पोलिसांत अपहरणासह विविध कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.
Baramati News : कारखेल येथे वीजेच्या धक्याने तरुणाचा मृत्यू, गावात शोककळातीन दिवसांची पोलिस कोठडी
संशयित मेहुणा संदीप चव्हाण व त्याच्या मित्राने अनिल अंबुरे यांचे चुंचाळे शिवारातून अपहरण करून परतूर (ता. जालना) गाठले होते. अंबड पोलिसांत गुन्हा दाखल होताच, वरिष्ठ निरीक्षक मधुकर कड यांनी तांत्रिक विश्लेषणानुसार संशयित हे परतूरमध्ये असल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार उपनिरीक्षक मुक्तेश्वर लाड व गुन्हे शोध पथकाने परतूर गाठत अपहृत अनिल अंबुरे यांची सुटका केली; तर संशयित मेहुणा संदीप चव्हाण यास अटक केली. त्याचा मित्र फरारी झाला आहे. संशयित चव्हाण यास न्यायालयाने तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली. अनिल अंबुरे यांना बेदम मारहाण करीत जखमी करण्यात आले होते.