संलग्न, एकात्मिक महाविद्यालयांचे पेव
esakal September 15, 2025 02:45 AM

‘इंटिग्रेटेड’ कॉलेजांचे गौडबंगाल : भाग एक

शहरात ठिकठिकाणी एकात्मिक महाविद्यालयांचे (इंटिग्रेटेड कॉलेज) जाळे वाढत आहे. या कनिष्ठ महाविद्यालयांकडे विद्यार्थी आणि पालकांचा कल दिसून येतो. दुसऱ्या बाजूला या महाविद्यालयांकडून शुल्काच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात शुल्क आकारले जाते. त्याचाच ‘हिशेब’ ठेवत या महाविद्यालयांकडून विद्यार्थ्यांच्या उपस्थिती आणि इतर अनेक नियमांना बगल दिली जाते. त्यातून शिक्षण विभागाचे अनेक नियम धाब्यावर बसविले जातात. त्यामुळे ही महाविद्यालये गेल्या अनेक वर्षांपासून वादाच्या भोवऱ्यात अडकली आहेत. येथील आर्थिक उलाढाल लक्षात घेता या महाविद्यालयांवर राजकीय आणि शिक्षण क्षेत्रातील अनेकांची मेहेरनजर असल्याचे बोलले जात आहे.

आशा साळवी : सकाळ वृत्तसेवा
पिंपरी, ता. १३ : शहरात एकात्मिक महाविद्यालयांची (इंटिग्रेटड कॉलेज) संख्या प्रत्येक वर्षी वाढत आहे. त्यांना पालक-विद्यार्थ्यांचा प्रतिसादही मिळतो आहे. संलग्न (टायअप) महाविद्यालये, एकात्मिक महाविद्यालये आणि त्यांचे व्यवस्थापन वादाच्या भोवऱ्यात अडकल्याचे अनेकदा समोर आले. त्यामुळे ही संकल्पनाच रद्द करावी, अशी मागणी अनेक वर्षांपासून कायम आहे. मात्र, अद्यापही सरकारला या महाविद्यालयांवर कारवाई करता आलेली नाही. गेल्या वर्षी सरकारने या महाविद्यालयांना एक नियमावली लावण्याचा प्रयत्न केला खरा; पण तो पूर्ण झालेला नाही. परिणामी, महाविद्यालयांना आयते कुरण मिळाले आहे.

या महाविद्यालयांमध्ये प्रवेश घेतलेल्या मुलांना अकरावी-बारावीच्या वर्षात फक्त नावाला प्रवेश असतो. तर; विद्यार्थी संबंधित खासगी क्लासमध्ये विविध प्रवेश परीक्षांची तयारी करत असतो. यावर लक्ष केंद्रीत करताना विद्यार्थ्यांना महाविद्यालयांमध्ये उपस्थितीमध्ये सवलत दिली जाते. शिकवणीचे सर्व वर्ग क्लासेसमध्ये चालतात. अनेक महाविद्यालयांमध्ये फक्त ‘प्रॅक्टिकल’पुरते मर्यादित राहिले आहेत. यात प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांची हजेरी घेतलीच जात नाही. तर; एकात्मिक महाविद्यालयांमध्ये तर त्यांच्या कोचिंग क्लासमध्येच हजेरी घेतली जाते. नियमानुसार विद्यार्थ्यांना परीक्षा द्यावयाची असल्यास त्यांना त्यांच्या महाविद्यालयांमध्ये ७५ टक्के उपस्थिती अनिवार्य असते. मात्र, या नियमांना या एकात्मिक महाविद्यालयांमध्ये केराची टोपली दाखाविली जाते. त्यामुळे अनेक विद्यार्थी या महाविद्यालयांमध्ये प्रवेशासाठी आता वळत आहेत. आपल्या पाल्याची कोचिंग क्लास आणि महाविद्यालय अशी दमछाक होऊ नये, म्हणून पालकदेखील या महाविद्यालयांमध्ये प्रवेशासाठी प्राधान्य देतात. त्यामुळे या महाविद्यालयांचे फावते आहे.


एकात्मिक महाविद्यालये म्हणजे काय?
मुळात एकात्मिक महाविद्यालयांची व्याख्या सोप्या शब्दांत करायची म्हणजे खासगी शिकवणी वर्ग (कोचिंग क्लासेस) आणि महाविद्यालये यांच्या संगनमताने सुरू झालेले महाविद्यालय. आज गल्ली-बोळांत अशी महाविद्यालये दिसून येतात. तेथे हुशार विद्यार्थ्यांची संख्या या महाविद्यालयांमध्ये लक्षणीय असल्याने काही प्राचार्यांनी या विरोधात चिंता व्यक्त केलेली आहे.

लाखो रुपयांचे शुल्क
मुळात पालकदेखील सर्रासपणे आपल्या मुलांना या महाविद्यालयांमध्ये प्रवेश घेण्यासाठी लाखो रुपयांची शुल्क (फी) या संस्थांना देऊ करतात. आज या महाविद्यालयांची फी सरासरी पाच लाख ते दहा लाखांच्या घरात आहे. ज्यात अकरावी-बारावी आणि जेईई, एमएचटी-सीईटी आयआयटी प्रवेशांसाठींच्या परीक्षेपर्यंतची फी आकारली जाते. एकीकडे नामांकित महाविद्यालयांमध्ये प्रवेश मिळावा, यासाठी विद्यार्थ्यांसह पालक बरेच कष्ट करतात; पण आता हे चित्र बदलून एकात्मिक महाविद्यालयांमध्ये प्रवेशासाठी पालकांची धावपळ सुरू असल्याचे दिसून येत आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.